Chandrayaan-3: चंद्रावर उतरणाऱ्या लँडर-रोव्हरचं आयुष्य अवघं एका दिवसाचं? काय आहे कारण, पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 02:10 PM2023-08-23T14:10:48+5:302023-08-23T14:11:20+5:30
Chandrayaan-3: चंद्रावर उतरणारा भारताचा विक्रम लँडर आणि चंद्राच्या पृष्टभागावर फिरणारा प्रज्ञान रोव्हर यांचं आयुर्मान अवघं एका दिवसाचं असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच एवढ्या मोठ्या मोहिमेतील महत्त्वाच्या घटकाचं आयुर्मान केवळ एकाच दिवसाचं कसं आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.
अंतराळ संशोधनाच्या इतिहासामध्ये भारतासाठी आजचा दिवस हा महत्त्वाचा ठरणार आहे. चंद्राच्या दिशेनं झेपावलेलं भारताचं चंद्रयान-३ चंद्राच्या कक्षेत फिरत असून आज या यानामधील विक्रम लँडर हा चंद्राच्या पृष्टभागावर उतरणार आहे. विक्रम लँडर चंद्राच्या पृष्टभागावर यशस्वीरीत्या उतरल्यास चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरीत्या उतरणारा भारत हा पहिला देश ठरणार आहे. मात्र चंद्रावर उतरणारा भारताचा विक्रम लँडर आणि चंद्राच्या पृष्टभागावर फिरणारा प्रज्ञान रोव्हर यांचं आयुर्मान अवघं एका दिवसाचं असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच एवढ्या मोठ्या मोहिमेतील महत्त्वाच्या घटकाचं आयुर्मान केवळ एकाच दिवसाचं कसं आहे, असा प्रश्न विचारला जात आहे. त्याचं उत्तर पुढीलप्रमाणे आहे.
सर्व काही सुरळीतपणे पार पडल्यास चंद्रयान-३ मधील विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरेल. या मोहिमेतील लँडर आणि रोव्हरचं आयुर्मान एक दिवसाचं असण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे ही दोन्ही यंत्रे हे सूर्यप्रकाशापासून मिळणाऱ्या उर्जेवर चार्ज होणारी आहे. चंद्रावरील एक दिवस हा पृथ्वीवरील १४ दिवसांएवढा असतो. आज २३ ऑगस्ट रोजी चंद्रावर सूर्योदय होणार आहे. त्यामुळे चंद्रयान-३ मधील लँडर आणि रोव्हर हे १४ दिवसांपर्यंत चंद्राच्या पृष्टभागावर काम करतील. त्यानंतर चंद्राच्या या भागात सूर्यास्त होईल. त्यामुळे या यंत्रांना उर्जा मिळणार नाही. तसेच तेथील अतिथंड वातावरणामुळे ती निष्क्रिय होण्याची शक्यता आहे. मात्र तिथे पुन्हा सूर्योदय झाल्यावर जर रोव्हर आणि लँडरने काम केल्यास ती अधिक काळ कार्यरत राहण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
नियोजित वेळेनुसार आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी लँडर विक्रम चंद्राच्या पृष्टभागावर यशस्वीरीत्या उतरल्यास तो लगेच आपलं काम सुरू करेल. लँडिंग यशस्वी झाल्यानंतर त्यामधून प्रज्ञान हा सहा पायांचा रोव्हर बाहेर येईल. त्याल इस्त्रोकडून कमांड मिळताच तो चंद्राच्या पृष्टभागावर चालेल. तो ५०० मीटरपर्यंत जाऊन पाणी आणि तेथील वातावरणाबाबतची माहिती इस्रोला देईल. यादरम्यान प्रज्ञान त्याच्या चाकांवर लावलेले अशोक स्तंभ आणि इस्रोच्या चिन्हाची छापही चंद्रावर सोडेल.
चंद्रावर पाठवलेले लँडर आणि रोव्हर हे चंद्रावर एका दिवसापर्यंत म्हणजेच पृथ्वीवरील १४ दिवस काम करतील अशी अपेक्षा आहे. मात्र प्रॉपल्शन मॉड्युलचा विचार केल्यास तो चार ते पाच वर्षे कार्यरत राहण्याची शक्यता आहे. तसेच हे तिघेही यापेक्षा अधिक काळ काम करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्याचं कारण म्हणजे इस्त्रोचे बहुतांश उपग्रह हे अपेक्षेपेक्षा अधिक काळ कार्यरत राहिले होते.