चंद्रयान- 3 आज अवकाशात झेपावणार; रॉकेट नेणार भारतीयांचे स्वप्न गगनात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 07:05 AM2023-07-14T07:05:28+5:302023-07-14T07:06:00+5:30
लॅण्डरच्या चार कोपऱ्यांवर चार इंजिन (थ्रस्टर्स) असतील; पण गेल्या वेळी मध्यभागी असलेले पाचवे इंजिन काढून टाकण्यात आले आहे
हैदराबाद : सर्व देशवासीयांचे लक्ष लागलेल्या चंद्रयान-३च्या प्रक्षेपणासाठी बाहुबली रॉकेट म्हणजेच लॉन्च व्हेईकल मार्क-३ (एलव्हीएम-३) आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा केंद्रावर सज्ज झाले आहे.
आज दुपारी २.३५ वाजता चंद्रयान अवकाशात झेपावणार असून, आतापर्यंत या रॉकेटने १०० टक्के यशस्वी प्रक्षेपण केले आहे. प्रक्षेपण तर यशस्वी होणारच; पण पुढे चंद्रावर ऐतिहासिक लॅण्डिंगच्या यशाबद्दलही शास्त्रज्ञ आशावादी आहेत. गुरुवारी दुपारी १.०५ मिनिटांनी चंद्रयान-३ चे काउंटडाउन सुरू झाले. तत्पूर्वी मोहिमेच्या यशासाठी इस्रोचे शास्त्रज्ञ तिरूपतीच्या व्यंकटचलपती मंदिरात पोहोचले. शास्त्रज्ञांनी पूजेसाठी चंद्रयान-३ चे लघु मॉडेलही मंदिरात नेले होते.
लॅण्डरच्या चार कोपऱ्यांवर चार इंजिन (थ्रस्टर्स) असतील; पण गेल्या वेळी मध्यभागी असलेले पाचवे इंजिन काढून टाकण्यात आले आहे. याशिवाय, दोन इंजिनांच्या मदतीने अंतिम लॅण्डिंग केले जाईल. चंद्रयान-३ला ऑर्बिटर नसून एक प्रोपल्शन मॉड्यूल असेल जे लॅण्डर आणि रोव्हरपासून वेगळे झाल्यानंतरही चंद्राभोवती फिरेल आणि चंद्रावरून पृथ्वीवरील जीवनाची पदचिन्हे शोधण्याचा प्रयत्न करेल.
लॅण्डरमध्ये ५, रोव्हरमध्ये २ उपकरणे आहेत. ते तापमान, माती व वातावरणातील घटक आणि वायू याची नोंद घेतील.
चंद्रावर ‘सॉफ्ट लॅण्डिंग’ अतिशय कठीण आहे. हे अभियान इस्रोसाठी महत्त्वाचा टप्पा आहे. ही मोहीम यशस्वी झाली पाहिजे, जेणेकरून भारत अंतराळ संशोधनात मोठा टप्पा पार करू शकेल. - जी. माधवन नायर, माजी अध्यक्ष, इस्रो