चंद्रयान-४, मंगळयान-२, शुक्रयान-१...; अवकाशात वाजणार भारताचा डंका! मोदी 3.0 मध्ये लॉन्च होणार हे 5 मिशन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 07:38 PM2024-06-19T19:38:57+5:302024-06-19T19:40:47+5:30
आता, मोदी 3.0 च्या या पाच वर्षांच्या कार्यकाळात इस्रो अनेक मोठ्या मोहिमा राबवणार आहे. तर जाणून घेऊयात भारताच्या भविष्यातील 5 अंतराळ मोहिमांसंदर्भात...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा देशाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. याला 'मोदी 3.0' असे संबोधले जात आहे. मोदी 3.0 मध्ये स्पेस सेक्टरवर अधिक भर असणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या गेल्या दोन कार्यकाळांत भारताने अवकाश क्षेत्रात अनेक पराक्रम गाजवले. महत्वाचे म्हणजे, अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) चांद्रयान-3 चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग झाले आणि अशी कामगिरी करणारा भारत हा जगातील पहिला देश बनवला. यानंतर, सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आपण 'आदित्य' अंतराळयान L1 पॉइंटवर पाठवले आहे. आता, मोदी 3.0 च्या या पाच वर्षांच्या कार्यकाळात इस्रो अनेक मोठ्या मोहिमा राबवणार आहे. तर जाणून घेऊयात भारताच्या भविष्यातील 5 अंतराळ मोहिमांसंदर्भात...
NISAR मिशन -
अमेरिकन अंतराळ संस्था नासा आणि इस्रोचे हे संयुक्त मिशन आहे. हे मिशन याच वर्षात लॉन्चसाठी सज्ज आहे. NISAR म्हणजेच, NASA-ISRO Synthetic Aperture Radar. प्रगत रडार तंत्रज्ञानाच्या सहाय्याने, हे मिशन पृथ्वीवरील परिसंस्था, बर्फाचे द्रव्यमान आणि नैसर्गिक आपत्तींसंदर्भात अध्ययन करेल. NISAR कडून आपल्याला हवामान बदल आणि आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित महत्त्वाचा डेटा मिळेल.
मिशन चंद्रयान-4 -
भारताच्या चांद्रयान-३ ने अंतराळ क्षेत्रात इतिहास रचला. 2028 मध्ये चांद्रयान-4 लाँच करण्याची तयारी सुरू आहे. इस्रोला या मोहिमेद्वारे चंद्रावरून नमुने आणायचे आहेत. म्हणजेच चांद्रयान-4 केवळ चंद्रावर उतरणार नाही, तर तेथून नमुने घेऊन सविस्तर विश्लेषणासाठी पृथ्वीवरही आणेल.
मिशन मंगळयान-2 -
मंगळयान-1 च्या यशानंतर संपूर्ण देशाने आनंद साजरा केला होता. आता 2026 मध्ये मंगळयान-2 लॉन्च होणे अपेक्षित आहे. मंगळयान-2 आपल्याला मंगळ ग्रहासंदर्भात अधिक माहिती देईल. या मोहिमेचा उद्देश मंगळाचा पृष्ठभाग आणि त्याचे वातावरण समजून घेणे, तसेच जीवनाच्या संभाव्य अस्तित्वाची प्राचीन संकेत शोधणे असा आहे.
मिशन शुक्रयान-1 -
भारत आता पुढील वर्षापर्यंत शुक्र ग्रहाच्या संशोधनासाठी अवकाशयान पाठवण्याच्या तयारीत आहे. शुक्रयान-1 मोहीम प्रत्यक्षात एक ऑर्बिटर असेल जे शुक्र ग्रहाभोवती फिरेल आणि त्याच्या वातावरणाची आणि पृष्ठभागाची माहिती गोळा करेल. यामुळे शास्त्रज्ञांना शुक्रावरील हवामान आणि भूगर्भीय प्रक्रिया समजण्यास मदत होईल.
NASA चे मिशन आर्टेमिस -
NASA च्या आर्टेमिस मिशनमध्ये भारताचाही समावेश असेल. या मिशनच्या माध्यमाने पुन्हा एकदा मानवाला चंद्रावर पाठविण्याची तयारी आहे. तेथे अधिक काळापर्यंत कशा प्रकारे राहता येईल, हे देखील आर्टेमिस मिशनच्या उद्दीष्टांपैकी एक उद्दिष्ट आहे.