चांद्रयान उद्या करणार चंद्रावर ऐतिहासिक लँडिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 10:34 AM2019-09-06T10:34:00+5:302019-09-06T10:48:39+5:30
चंद्रापासून अवघ्या ३५ किलोमीटर वर असलेले हे यान शनिवारी पहाटे १.३० ते २.३० दरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून इतिहास रचणार आहे.
निनाद देशमुख -
बंगळुरू : महिन्याभरापासून अनेक महत्त्वाचे टप्पे पार पाडत भारताचे महत्त्वाकांक्षी चांद्रयन अखेर चंद्राच्या एकदम जवळ पोहोचले आहे. चंद्रापासून अवघ्या ३५ किलोमीटर वर असलेले हे यान शनिवारी पहाटे १.३० ते २.३० दरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून इतिहास रचणार आहे. हा क्षण भारतीयांसाठी अभिमानाचा ठरणार आहे. अतिशय अवघड असणाऱ्या या मोहिमेकडे साऱ्या जगाचे लक्ष लागून आहे. बंगळुरू येथील डीप स्पेस सेंटर येथील अँटिनाद्वारे यानाचे नियंत्रण सुरू आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांचे मनोबल वाढविण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.
चंद्रावर पाणी तसेच अनेक महत्त्वाच्या खनिजांचा शोध घेण्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) चांद्रयान २ मोहिमेची आखणी केली. त्यानुसार ऑर्बिटर, विक्रम लँडर व प्रज्ञान रोव्हर असलेले चांद्रयान २ भारतीय बनावटीचे बाहुबली प्रक्षेपास्त्र जीएसलव्ही मार्क ३ ने २२ जुलैला अवकाशात पाठविले.
२४ जुलैला पृथ्वीच्या पहिल्या कक्षेतील फेरी यानाने यशस्वीरीत्या पूर्ण केली. या वेळी यानाचे इंजिन ४८ सेकंदासाठी प्रज्वलित करून यानाला १७० बाय ४४,५४७५ दीर्घ वर्तुळाकार कक्षेत सोडले. २६ जुलै रोजी रात्री १ वाजून ८ मिनिटांनी पृथ्वीच्या दुसऱ्या कक्षेतील प्रदक्षिणा पूर्ण केली. यानंतर २९ जुलैला तिसरी दीर्घ वर्तुळाकार कक्षा पार केली. ४ ऑगस्टला यानाच्या कॅमेऱ्याने अंतराळातून पृथ्वीची छायाचित्रे पाठविली होती.
पृथ्वीभोवतीच्या सहा दीर्घ वर्तुळाकार फेऱ्या पूर्ण करून १४ ऑगस्टला चांद्रयान चंद्राच्या दिशेने पाठविले. २० ऑगस्टला यानाने मोहिमेतील दुसरा महत्त्वाचा टप्पा गाठला. यानाचे द्रवरूप इंजिन काही काळ सुरू करून यान चंद्राच्या कक्षेत पोहचले. यानाला ११४ बाय १८०७२ किलोमीटर चंद्राच्या दीर्घ वर्तुळाकार कक्षेत पाठविले. २२ ऑगस्टला यानाच्या एल १४ कॅमेऱ्याने चंद्राची आकर्षक छायाचिते पाठवून यान उत्तम काम करत असल्याचे सिद्ध केले. तर २६ ऑगस्ट ला यानाच्या टेरेन मॅपिंग कॅमेऱ्याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील अनेक विवरांचे छायाचित्र पाठविली. २८ व ३० ऑगस्टला अनुक्रमे चंद्राभोवतीचे तिसरे आणि चौथी दीर्घवर्तुळाकार फेरी पूर्ण करून यान चंद्राच्या अधिक जवळ पोहचले.
..........................
... असे होणार सॉफ्ट लँडिंग
बुधवारी विक्रम लँडरने मोहिमेच्या शेवटच्या कक्षेत प्रेवेश केला. शनिवारी रात्री १.३० ते २.३० च्या दरम्यान यानाला चंद्रावर उतरविण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. अतिशय अवघड आणि आव्हानात्मक काम शास्त्रज्ञांपुढे राहणार आहे. १ वाजून ५५ मिनिटांनी विक्रम लँडर चंद्रावर उतरविण्यासाठी मुख्य इंजिन सुरू होईल. यानाचे सर्व नियंत्रण इस्रोच्या बंगळुरू येथील टेलिमेंट्री ट्रेकिंग कमांड नेटवर्क आणि व्यावलु येथील डीप स्पेस सेंटर येथील केंद्रातून करण्यात येत आहे.
विक्रम लँडरपुढे चंद्रवार उतरताना सर्वांत मोठे आव्हान असणार आहे ते चंद्रवरील धुळीचे. यान उतरल्यावर या धुळीमुळे यानाचे सौर पॅनल तसेच कॅमेरा खराब होण्याची शक्यता आहे. यामुळे उतरण्याआधी विक्रम वरील कॅमेऱ्याच्या साह्याने योग्य जागा शोधली जाणार आहे. चंद्रावरील मेंझिनिस सी आणि सिम्पेलिअस एन या दोन विवारांच्या मध्ये असणाऱ्या सपाट भागी यान उतरविले जाणार आहे. यान चंद्रवार उतरताना यानाच्या मध्यभागी असलेले इंधन प्रज्वलित केले जाईल. यामुळे चंद्रावरील धूळ यानावर न येता बाजूला उडेल. यानाचे सॉफ्ट लँडिंग झाल्यावर दोन तासांनी म्हणजे ५.३० ते ६.३० च्या दरम्यान विक्रम लँडरमधून प्रग्यान रोव्हर बाहेर पडेल. हा काळ शास्त्रज्ञांसाठी आव्हान ठरणार आहे. लँडिंग सुरळीत पार पाडण्यासाठी यानावर आवश्यक संदेश यंत्रणा व संगणक प्रणाली कार्यान्वित करण्याचे काम सुरू आहे.
...................
१ सप्टेंबरला पाचवी फेरी पूर्ण केल्यावर सोमवारी दि. २ रोजी ऑर्बिटपासून विक्रम लँडर यशस्वीरीत्या वेगळे केले. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी अतिशय किचकट असणारी ही प्रक्रिया सुनियोजितरीत्या पार पाडली. दि. ३ रोजी विक्रम लँडर चंद्राच्या अधिक जवळ जात १०४ बाय १२८ किलोमीटर दीर्घ वर्तुळाकार कक्षेत पोहोचले. बुधवारी विक्रम लँडरची भ्रमण कक्षा आणखी कमी करत ३५ किमीपर्यंत आणली आहे.
.......