300हून अधिक रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल, जाणून घ्या नवं वेळापत्रक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 12:13 PM2018-08-14T12:13:01+5:302018-08-14T12:13:24+5:30
रेल्वे प्रशासनाच्या नव्या वेळापत्रकानुसार उत्तर रेल्वेच्या 300हून अधिक गाड्यांची वेळ बदलण्यात आली आहे.
नवी दिल्ली- रेल्वे प्रशासनाच्या नव्या वेळापत्रकानुसार उत्तर रेल्वेच्या 300हून अधिक गाड्यांची वेळ बदलण्यात आली आहे. रेल्वेच्या या नव्या वेळापत्रकाची 15 ऑगस्टपासून अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे तुम्हाला ट्रेनचं हे बदलेलं वेळापत्रक माहिती करून घ्यायचं असल्यास तुम्हाला 139 या क्रमांकावर संपर्क साधावा लागणार आहे.
या नव्या वेळापत्रकानुसार, 57 ट्रेन या नियोजित वेळेच्या पूर्वी धावणार आहेत. तर 58 ट्रेन्स नियोजित वेळेनंतर सोडल्या जातील. तसेच जवळपास 102 ट्रेन्स या नियोजित वेळेपूर्वी स्थानकांमध्ये दाखल होणार आहेत. 84 ट्रेन्स नियोजित वेळेपेक्षा उशिरानं स्थानकांत दाखल होतील. तसेच प्रवासी या नव्या वेळापत्रकाची माहिती आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून मिळवू शकतात. ज्या प्रवाशांचं तिकीट आरक्षित झालं आहे, त्यांना एसएमएसद्वारे रेल्वे प्रशासनाकडून बदललेल्या वेळापत्रकाची माहिती दिली जातेय.
15 ऑगस्ट रोजी लागू होणा-या नव्या वेळापत्रकानुसार 110 किलोमीटर प्रतितास धावणा-या ट्रेनचा वेग 105 किलोमीटर प्रतितासावर आणण्यात आला आहे. तर प्रतितास 120 किलोमीटर वेघानं धावणा-या रेल्वेच्या गाड्यांचा स्पीड 115 किलोमीटर प्रतितासावर आणला आहे. बदललेल्या रेल्वेच्या वेळापत्रकात अमृतसर एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस, लखनऊ मेल, तेजस एक्सप्रेस, हमसफर एक्सप्रेस, अंतयोदय एक्सप्रेस, नीलांटल एक्सप्रेस, डेहराडून-अमृतसर एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस या ट्रेनचा समावेश आहे. त्यामुळे ट्रेनच्या बदललेल्या वेळापत्रकाचा प्रवाशांना फटका बसणार आहे.