भारत-पाक सामन्यानंतर गोंधळ, अभियांत्रिकी महाविद्यालयातील काश्मिरी विद्यार्थ्यांवर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 12:24 PM2021-10-25T12:24:50+5:302021-10-25T12:32:22+5:30
India-Pak T20 Match :पंजाबमधील एका महाविद्यालयात काही काश्मिरी विद्यार्थ्यांवर कथितरित्या हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे.
चंदीगड: काल म्हणजेच 24 ऑक्टोबरला झालेल्या भारत-पाकिस्तान यांच्यातील टी-20 विश्वचषक सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला. यावरुन भारतीयांमध्ये तीव्र नाराजी पसरलीये. या नाराजीचे परीणाम विविध ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पंजाबमधील एका महाविद्यालयात काही काश्मिरी विद्यार्थ्यांवर कथितपणे हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाई गुरदास इंस्टीट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये विद्यार्थी भारत-पाकिस्तान सामना पाहत होते. त्या सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर काही उत्तर प्रदेशच्या विद्यार्थ्यांनी काश्मिरी विद्यार्थ्यांवर कथितरित्या हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, याप्रकरणी कोणत्याही बाजूने किंवा कॉलेज व्यवस्थापनाकडून तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
नेमकं काय झालं ?
पंजाबच्या संगरgर जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील काश्मिरी विद्यार्थ्यांनी आरोप केला की, भारताचा टी-20 विश्वचषक सामन्यात पराभव होताच, यूपीच्या काही विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. याबाबत बोलताना काश्मीरी विद्यार्थी म्हणाले की, आम्ही इथे शिकण्यासाठी आलो आहोत. आम्ही सर्व भारतीय आहोत, पण तरीदेखील आमच्याशी अशी वागणूक करण्यात आली. या विद्यार्थ्यांनी त्यांच्या खोल्यांमध्ये तोडफोड केल्याचा आरोपही केल आहे.