Vaishno Devi Stampede: वैष्णाेदेवी मंदिरात चेंगराचेंगरी; १२ भाविक ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 07:16 IST2022-01-02T07:16:10+5:302022-01-02T07:16:26+5:30
काेराेनाचे निर्बंध असूनही हजाराे भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली हाेती. शारीरिक अंतर व मास्क यांचेही कोणी पालन केले नव्हते.

Vaishno Devi Stampede: वैष्णाेदेवी मंदिरात चेंगराचेंगरी; १२ भाविक ठार
सुरेश डुग्गर
लाेकमत न्यूज नेटवर्क
जम्मू : माता वैष्णाेदेवी मंदिरात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या चेंगराचेंगरीत १२ भाविकांचा मृत्यू झाला, तर १६ जण जखमी झाले. मृत्यू झालेल्यांपैकी ७ जण उत्तर प्रदेशचे, ३ जण दिल्लीचे तर प्रत्येकी १ जण हरयाणा आणि जम्मू येथील हाेते. या घटनेची चौकशी प्रधान सचिवांची समिती करणार आहे.
काेराेनाचे निर्बंध असूनही हजाराे भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली हाेती. शारीरिक अंतर व मास्क यांचेही कोणी पालन केले नव्हते. पहाटे २.४५ च्या सुमारास अत्यंत अरुंद अशा गेट क्रमांक ३ जवळ चेंगराचेंगरी झाली. दर्शनानंतरही
अनेक भाविक तेथेच थांबले हाेते. त्यामुळे वादावादी झाली. त्यातून धक्काबुक्की व नंतर चेंगराचेंगरी झाली.
मृतांच्या नातेवाईकांना मदत
मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधानांनी २ लाख रुपयांची, तर जखमींना ५० हजारांची मदत जाहीर केली आहे. जम्मू प्रशासनाने मृतांच्या नातेवाईकांना १० लाख, तर जखमींना २ लाख रुपयांची तसेच वैष्णाे देवी समितीनेही मदत जाहीर केली आहे.
हरयाणात दरड काेसळून चौघांचा मृत्यू
हरयाणाच्या भिवानी जिल्ह्यात डाडम येथे खाेदकामादरम्यान डाेंगराचा माेठा भाग काेसळला. त्याखाली दबून चौघांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अनेक जण खचलेल्या डोंगराखाली दबले असल्याची भीती व्यक्त होत आहे. खाेदकाम करण्यासाठी स्फाेटकांचा वापर करण्यात आला.