एकाचवेळी १२०० चपात्या बनवल्या जाणार, अयोध्येत अन्न प्रसादासाठी अजमेरहून खास भेट!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 10:18 PM2024-01-08T22:18:48+5:302024-01-08T22:20:52+5:30
Ram Mandir Ayodhya : वासुदेव देवनानी यांनी सांगितले की, २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्रभू रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.
अयोध्येतील लोकांसाठी अन्न प्रसादात चपात्या बनवल्या जाणार आहेत. यासाठी अजमेर येथील आठ चपात्या बनवणाऱ्या मशीन्स रवाना झाला आहेत. राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष वासुदेव देवनानी यांनी सोमवारी अजमेर येथून या मशीन्सना हिरवा झेंडा दाखवून अयोध्येला रवाना केले. वासुदेव देवनानी यांनी सांगितले की, २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्रभू रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येत राम मंदिराचे काम होत आहे. मंदिरातील गर्भगृहात प्रभू राम विराजमान होणार आहेत, हे सर्वांचे भाग्य आहे. अयोध्या शहर हे जगातील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र बनणार आहे. अयोध्येतील माँ सीता भोजनशाळेत तयार होणाऱ्या चपातीसाठी या मशीन्स पाठवण्यात आल्या आहेत. या आठ मशीन्समधून एकावेळी १२०० चपात्या बनवल्या जातील. अजमेरचे ५० कर्मचारीही तेथे कार्यरत असल्याचेही वासुदेव देवनानी यांनी सांगितले.
रामलला प्राणप्रतिष्ठा उत्सव २२ जानेवारीला अयोध्येत होणार आहे. दुसरीकडे, या सोहळ्यासाठी ३६१० किलो वजनाची १०८ फूट लांब अगरबत्ती गुजरातहून अयोध्येला आणली जात आहे. सोमवारी अगरबत्तीचा ट्रेलर भरतपूरच्या आग्रा-जयपूर राष्ट्रीय महामार्गावरून अयोध्येकडे रवाना झाला. अनेक भाविकांनी महामार्गावर पोहोचून जय श्री रामचा जयघोष केला. ही अगरबत्ती गुजरातमध्ये तयार करण्यात आली आहे. ती बनवण्यासाठी ६ महिने लागले.
अगरबत्तीमध्ये अनेक प्रकारच्या औषधी वनस्पतींचा समावेश करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ही अगरबत्ती सुमारे दीड महिना जळत राहील आणि ५० किलोमीटर परिसरात सुगंध पसरवेल. या अगरबत्तीची रुंदी सुमारे साडेतीन फूट आहे. याशिवाय, श्रीलंकेतील अशोक वाटिका येथील चरण पादुका छत्तीसगडच्या मनेंद्रगड जिल्ह्यात पोहोचली, जिथे श्री रामाच्या चरण पादुकाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक जमले होते. ही यात्रा राम वन गमन पथमार्गे अयोध्येत पोहोचेल. १५ डिसेंबरला सुरू झालेली ही यात्रा २२ जानेवारीला अयोध्येत संपेल.