पक्ष्याची धडक बसून 'चेपले' एअर इंडियाचे विमान
By admin | Published: March 23, 2017 01:47 PM2017-03-23T13:47:07+5:302017-03-23T13:47:07+5:30
एअर इंडियाच्या अहमदाबाद-लंडन-नेवार्क विमानाला बुधवारी सकाळी पक्ष्याने जोरदार धडक दिल्यामुळे एअर इंडियाला विमान रद्द करावे लागले.
Next
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 23 - एअर इंडियाच्या अहमदाबाद-लंडन-नेवार्क विमानाला बुधवारी सकाळी पक्ष्याने धडक दिल्यामुळे चक्क विमानाचे नुकसान झाले. एअर इंडियाला विमान रद्द करावे लागले. एअर इंडियाचे -171 विमान लंडनच्या जवळ असताना विमानाला पक्ष्याची धडक बसली. यामध्ये विमानाच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले. विमान 10.39 च्या सुमारास हिथ्रो विमातळावर उतरल्यानंतर लंडन-नेवार्क हा प्रवासाचा पुढचा टप्पा रद्द करण्यात आला.
विमानाच्या पुढच्या भागाचे आणि रडार अँटीनाचे नुकसान झाले. विमानात एकूण 230 प्रवासी होते. त्यातील 50 जण नेवार्कला जाणारे होते. त्यांची व्यवस्था दुस-या विमानात करण्यात आली. ज्यांनी लंडन-अहमदाबाद परतीच्या प्रवासाचे तिकीट बुक केले होते. त्यांची व्यवस्था लंडन-मुंबई विमानामध्ये करण्यात आली. हिथ्रो विमानतळावर या विमानाची दुरुस्ती करण्यात येईल. त्यानंतर पुन्हा हे विमान लंडन- अहमदाबाद परतीचा प्रवास करेल असे एअर इंडियाने सांगितले.
महिन्याभरापूर्वी एअर इंडियाच्या भोपाळ-नवी दिल्ली विमानाला पक्ष्याची धडक बसून विमानाच्या इंजिन ब्लेडचे नुकसान झाले होते. त्यामुळे विमान तातडीने जयपूर विमानतळावर उतरवावे लागले होते. या विमानात 122 प्रवासी होते. पक्ष्याच्या धडकेमुळे विमानाच्या सात ब्लेडसचे नुकसान झाले. विमानातील आंतरराष्ट्रीय प्रवाशांना नवी दिल्लीपर्यंत पोहोचण्यासाठी टॅक्सीची व्यवस्था करुन देण्यात आली. भाजपाचे राज्यसभा खासदार प्रभात झा या प्रवाशांमध्ये होते. त्यांनी समयसूचकता दाखवून वैमानिकाने ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली त्याबद्दल वैमानिकाचे कौतुक केले होते.