राजकीय गुरुच्या ‘कुशीत’ घेतली चिरनिद्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 05:52 IST2018-08-09T05:51:51+5:302018-08-09T05:52:19+5:30
दफनस्थानावरून झालेल्या वादातून द्राविडी पक्षांमधील आपसातील वितुष्ट मृत्यूनंतरही संपत नसल्याचे क्लेषकारी चित्र पाहायला मिळाले.

राजकीय गुरुच्या ‘कुशीत’ घेतली चिरनिद्रा
चेन्नई : एम. करुणानिधी यांच्या निधनामुळे तमिळनाडूतील द्राविडी चळवळीतील शेवटचा आधारवड गेला, अशी आदरयुक्त भावना देशभरातील सर्वच राजकीय नेत्यांनी व्यक्त केली असली तरी त्यांच्या दफनस्थानावरून झालेल्या वादातून द्राविडी पक्षांमधील आपसातील वितुष्ट मृत्यूनंतरही संपत नसल्याचे क्लेषकारी चित्र पाहायला मिळाले. अखेर मद्रास उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करून दफनासाठी मरिना बीचवर जागा द्या, असा आदेश दिल्याने करुणानिधी यांना त्यांचे दिवंगत राजकीय गुरु सी. एन. अण्णादुरई यांच्या कुशीत चिरनिद्रा घेणे शक्य झाले.
पेरियार रामस्वामी यांनी स्थापन केलेल्या मुळच्या द्रविड कळघममधून करुणानिधी ६८ वर्षांपूर्वी अण्णादुरई यांचे बोट धरून बाहेर पडले होते व त्यातूनच आजचा द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) पक्ष उभा राहिला. करणानिधी तब्बल ५० वर्षे द्रमुकचे अनभिषिक्त अध्यक्ष होते. करुणानिधी यांच्या मरिना बिचवरील दफनविधीने त्यांच्या कोट्यवधी चाहत्याची इच्छा पूर्ण झाली. योगायोग असा की, करुणानिधी यांच्या पार्थिवाचे दफन एककीकडे त्यांचे राजकीय गुरु अण्णादुरई व दुसरीकडे कट्टर राजकीय विरोधक जयललित यांच्या मधल्या जागेत केले गेले. अशा प्रकारे त्यांना गुरु व विरोधक या दोघांचा चिरसहवास लाभला!
>करुणानिधी यांच्या निधनाच्या काही तास आधी त्यांचे चिरंजीव एम. के. स्टॅलिन यांनी मुख्यमंत्री एडापद्दी पलानीस्वामी यांची भेट घेऊन मरिना बीचवर स्मारकासाठी जागा देण्याची विनंती केली. सरकारने ती नाकारली व गुंडी येथील गांधी मंडपापाशी दोन एकर जागा देऊ केली.