चारधाम यात्रेसाठी आता कर्नाटकात ‘आधार’ हवाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 04:03 AM2017-09-02T04:03:49+5:302017-09-02T04:04:05+5:30
कर्नाटकातून उत्तराखंडमधील बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चारधाम यात्रेला जाणा-यांसाठी आधारकार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. या यात्रेसाठी कर्नाटक सरकार माणशी २० हजार रुपयांचे प्रवास अनुदान देते.
बंगळुरू : कर्नाटकातून उत्तराखंडमधील बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चारधाम यात्रेला जाणा-यांसाठी आधारकार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. या यात्रेसाठी कर्नाटक सरकार माणशी २० हजार रुपयांचे प्रवास अनुदान देते. त्याचा संभाव्य गैरवापर टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
या चारधाम यात्रेसाठी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केलेल्या आहेत. त्यानुसार या यात्रेच्या अनुदानासाठी अर्ज करणा-याला आधारकार्ड सादर करावे लागेल. धार्मिक कामकाज विभागाच्या अधिका-याने म्हटले आहे की, कर्नाटकचे कायमचे रहिवासी असलेले जवळपास १,००० ते १,५०० लोक दरवर्षी चारधाम यात्रेच्या अनुदानाचा लाभ घेतात. या वर्षी ही संख्या वाढण्याची शक्यता आहे, कारण मोठ्या संख्येतील खासगी यात्रा आयोजकांनी या अनुदानाचे आमिष दाखवायला सुरुवात केली आहे. या परिस्थिती या अनुदानाचा गैरवापर होण्याची मोठी शक्यता आहे किंवा लोक प्रवासाची बनावट कागदपत्रे सादर करू शकतील.
हे टाळण्यासाठी आधार अनिवार्य करण्यात आले आहे. कर्नाटकचे रहिवासी असलेल्यांना २०१४ पासून हे अनुदान दिले जात आहे. मध्यमवर्गीयांना या चारधाम यात्रेला जाता यावे, म्हणून सिद्धरामय्या सरकारने हे अनुदान द्यायला सुरवात केली होती. भाजपा सरकारने मानसरोवर यात्रसाठी प्रत्येकाला ३० हजार रुपयांच्या अनुदानाची घोषणा केली होती.