बंगळुरुत भररस्त्यात तरुणीची छेड, घटना सीसीटीव्हीत कैद
By admin | Published: March 22, 2017 03:57 PM2017-03-22T15:57:17+5:302017-03-22T15:57:17+5:30
रस्त्यावर चालत असलेल्या तरुणीची दुचाकीस्वारांनी छेड काढल्याची घटना शहरात घडली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 22 - रस्त्यावर चालत असलेल्या तरुणीची दुचाकीस्वारांनी छेड काढल्याची घटना शहरात घडली आहे. महिलांसाठी सुरक्षित शहरांमधील एक समजल्या जाणा-या बंगळुरु शहरात महिला छेडछाडीच्या अनेक घटना समोर येत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या घटनेत रस्त्यावर चालणा-या तरुणीचा हात पकडण्याचा प्रयत्न दुचाकीस्वाराने केला. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पश्चिम बंगळुरुमधील विजयनगर परिसरात ही घटना घडली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.
दोन तरुणी रस्त्यावरुन चालत असताना मागून येणा-या बाईकवरील दोन तरुणांपैकी एकजण तरुणीचा हात पकडत तिला खेचण्याचा प्रयत्न करत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत आहे. याप्रकरणी कोणतीही तक्रार अद्याप दाखल झालेली नाही. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. 'आम्ही पीडित तरुणींचा शोध घेत आहोत. सोबतच ज्याने हा व्हिडीओ अपलोड केला आहे त्यांचीही माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यानंतरच आम्हाला ही नेमकी छेडछाड होती की चोरीचा प्रयत्न होता हे लक्षात येईल', असं वरिष्ठ पोलीस अधिकारी अनुचेत यांनी सांगितलं आहे.
शहरामध्ये गेल्या काही महिन्यात छेडछाडीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. नवीन वर्ष साजरं करण्यासाठी एम जी रोडवर जमा झालेल्या अनेक तरुणी आणि महिलांचा विनयभंग झाल्याची घटना समोर आल्यानंतर महिला सुरक्षेचा प्रश्न उभा राहिला होता.
31 डिसेंबरच्या रात्री एमजी रोड आणि ब्रिगेड रोडवर नवीन वर्षाच्या स्वागताचं सेलिब्रेशन करण्यासाठी हजारो लोक जमा झाले होते. यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. रात्री 11 वाजता काही हुल्लडबाजांनी महिलांना हात लावण्यास आणि टिप्पणी करण्यास सुरुवात केली. धक्कादायक बाब म्हणजे परिसरात 1500 पोलीस तैनात असतानाही हा प्रकार घडला. पोलिसांनी आपण कोणत्याही परिस्थिती किंवा घटनेचा सामना करण्यासाठी सज्ज असून व्यवस्था करण्यात आल्याचा दावा केला होता.
हुल्लडबाजांनी अर्धी रात्र झाल्यानंतर सगळ्या सीमा पार केल्या आणि महिलांना हवं तिथे स्पर्श करण्यास सुरुवात केली. महिलांचा विनयभंग होत होता. परिस्थिती एवढी बिघडली होती की जमलेल्या तरुणी, महिलांनी सँडल, चपला हातात घेऊन मदतीसाठी धावण्यास सुरुवात केली.