सरन्यायाधीशांवरील आरोप : चौकशी समितीस कोणीही न्यायाधीश भेटलेले नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 06:12 AM2019-05-06T06:12:04+5:302019-05-06T06:12:17+5:30
सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांच्यावर असभ्य वर्तनाचे आरोप करणाऱ्या बडतर्फ महिला कर्मचाºयाने तीन न्यायाधीशांच्या ‘इन हाऊस’ चौैकशी समितीच्या कामकाजात सहभागी न होण्याचे जाहीर केल्यानंतर...
नवी दिल्ली : सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांच्यावर असभ्य वर्तनाचे आरोप करणाऱ्या बडतर्फ महिला कर्मचाºयाने तीन न्यायाधीशांच्या ‘इन हाऊस’ चौैकशी समितीच्या कामकाजात सहभागी न होण्याचे जाहीर केल्यानंतर न्या. रोहिंग्टन नरिमन व न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी चौकशी समितीचे प्रमुख न्या. शरद बोबडे यांना भेटून ही चौकशी एकतर्फी न करण्याची विनंती केली, याचा सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाने रविवारी स्पष्टपणे इन्कार केला.
न्यायालयाच्या महाप्रबंधकांनी निवेदनात म्हटले आहे की, सरन्यायाधीशांविरुद्धच्या चौकशीच्या संदर्भात न्या. नरिमन व न्या. चंद्रचूड यांनी शुक्रवारी सायंकाळी न्या. बोबडे यांची भेट घेतली, हे पूर्णपणे चुकीचे आहे. अशी कोणतीही भेट झालेली नसतानाही एका अग्रगण्य दैनिकाने तसे वृत्त प्रसिद्ध करावे हे खूपच दुर्दैवी आहे.
‘इन हाऊस’ चौकशी समिती न्यायालयाच्या अन्य कोणत्याही न्यायाधीशांकडून कोणत्याही प्रकारची मदत वा माहिती न घेता स्वत:च आपल्या पातळीवर काम करत असते, असेही निवेदनात स्पष्ट केले. तक्रारदार महिलेने गेल्या आठवड्यात चौकशी समितीपुढे तिसऱ्यांदा हजर राहिल्यानंतर यापुढे आपण या चौकशीच्या कामात सहभागी होणार नाही, असे जाहीर केले होते. आपण चौकशी समितीच्या सदस्यांना तसे सांगितले असता त्यांनी तुम्ही आला नाहीत, तर आम्ही एकतर्फी चौकशी करून निर्णय घेऊ, असे समितीने सांगितल्याचेही या महिलेचे म्हणणे होते. न्या. चंद्रचूड यांनी अशाच आशयाचे पत्रही न्या. बोबडे यांना लिहिल्याचा या वृत्तात उल्लेख
होता.
महिलेला वकील देण्याचा विचार करावा
या पार्श्वभूमीवर ‘इंडियन एक्स्प्रेस’ या इंग्रजी दैनिकाने रविवारी असे वृत्त प्रसिद्ध केले की, न्या. नरिमन व न्या. चंद्रचूड यांनी शुक्रवारी समितीचे प्रमुख न्या. बोबडे यांना भेटून एकतर्फी चौकशी केल्याने सर्वोच्च न्यायालयाची प्रतिमा आणखी डागाळेल त्यामुळे तसे न करता तक्रारदार महिलेला वकील देण्याचा किंवा ‘अॅमायकस क्युरी’ नेमण्याचा विचार करावा, अशी त्यांना विनती केली.