हाफिज सईदविरुद्ध आरोप निश्चित; दहशतवादाला अर्थसाहाय्य केल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 02:55 AM2019-12-12T02:55:53+5:302019-12-12T02:56:12+5:30
पंजाबच्या दहशतवादविरोधी विभागाने पुरावेही सादर केले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपींना आरोपपत्राची प्रत देण्यात आली आहे.
इस्लामाबाद : मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड हाफिज सईद याच्याविरुद्ध पाकिस्तानातीलदहशतवादविरोधी न्यायालयाने बुधवारी दहशतवादाला अर्थसाहाय्य केल्याचे आरोप निश्चित केले.दहशतवादविरोधी न्यायालयाचे (एटीसी) न्यायाधीश अरशद हुसैन भुट्टा यांनी सईद, हाफिज अब्दुल सलाम बिन मोहम्मद, मोहम्मद अशरफ आणि जफर इकबाल यांच्याविरुद्ध आरोप निश्चित केले. हे सर्व आरोपी त्यावेळी न्यायालयात हजर होते.
न्यायालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सईद आणि त्याच्या साथीदारांनी न्यायालयात अशी विनंती केली की, त्यांच्याविरुद्ध आरोप निश्चित करूनयेत. पंजाबचे उप अभियोजक जनरल अब्दुर रऊफ यांनी आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्याची विनंती केली आणि सांगितले की, सईद आणि अन्य आरोपी दहशतवादासाठी अर्थसहाय्य करण्यात सहभागी आहेत.
पंजाबच्या दहशतवादविरोधी विभागाने पुरावेही सादर केले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपींना आरोपपत्राची प्रत देण्यात आली आहे.
एटीसीने ७ डिसेंबर रोजी सईद आणि अन्य एक आरोपी जफर इकबाल यास न्यायालयात हजर केले होते. पंजाब पोलिसांच्या दहशतवादविरोधी विभागाने सईद आणि त्याच्या सहकाºयांविरुद्ध दहशतवादाला अर्थसहाय्य केल्याप्रकरणी पंजाब प्रांत आणि विविध शहरांत २३ गुन्हे दाखल केले होते. जमात-उद-दावाच्या या प्रमुखाला १७ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. तो लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात आहे.
फरार लोकांच्या मीडिया कव्हरेजवर प्रतिबंध
दोषी आणि फरार लोकांच्या मीडिया कव्हरेजवर अंकुश लावण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे.पंतप्रधानांचे विशेष सहायक फिरदौस एवान यांनी सांगितले की, पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.माजी पंतप्रधान नवाज शरीफ त्यांची मुलगी मरियम, मुले हसन व हुसैन नवाज आणि माजी वित्तमंत्री इसहाक डार यांच्याशी संबंधित निर्णय म्हणून याकडे पाहिले जात आहे.