कोल्ड ब्लडेड बिकिनी किलर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 09:46 AM2022-12-25T09:46:08+5:302022-12-25T09:47:54+5:30

वयाच्या 78 व्या वर्षी नेपाळच्या तुरुंगातून बाहेर पडणारा चार्ल्स शोभराज भविष्यात कोणते उपद्व्याप करणार, असाच प्रश्न आतापर्यंत त्याला पकडणाऱ्या पोलिसांना पडला असेल.

charles sobhraj how to become a cold blooded bikini killer | कोल्ड ब्लडेड बिकिनी किलर

कोल्ड ब्लडेड बिकिनी किलर

Next

रवींद्र राऊळ, वृत्तसंपादक

मुद्द्याची गोष्ट: माकड कितीही म्हातारे झाले तरी कोलांट्या उड्या मारणे काही सोडत नाही. आयुष्यातील निम्म्याहून अधिक म्हणजे तब्बल 45 वर्षांचा काळ वेगवेगळ्या देशांच्या तुरुंगांमध्ये काढल्यानंतर वयाच्या 78 व्या वर्षी नेपाळच्या तुरुंगातून बाहेर पडणारा चार्ल्स शोभराज भविष्यात कोणते उपद्व्याप करणार, असाच प्रश्न आतापर्यंत त्याला पकडणाऱ्या पोलिसांना पडला असेल.

अतिशय थंड डोक्याने २४ हून अधिक हत्या केल्याचा आरोप असलेल्या हतचंद भाओनानी गुरुमुख चार्ल्स शोभराज याची सुटका होण्याच्या वृत्तानेच जगभरातील तपास यंत्रणांचे कान टवकारले जावेत, तेही त्याच्या वृद्धापकाळात यावरूनच त्याच्या हिंस्र गुन्हेगारी कारवायांची कल्पना यावी. सिरीयल किलर, धोखेबाज, चोर, लुटारू चार्ल्स शोभराजच्या जीवनावर चित्रपट काढण्याचा मोह हॉलिवूडपासून बॉलिवूडवाल्यांनाही आवरता आला नाही. त्याच्या गुन्हेगारी आयुष्यावर अनेक पुस्तके प्रकाशित झाली. आपल्यावर चित्रपट, पुस्तके काढण्यासाठी त्याने हजारो डॉलर मोजून घेतले. पत्रकारांना मुलाखत देण्यासाठीही पैसे घेणारा हा कोल्ड ब्लडेड गुन्हेगार म्हणजे अजबच प्रकार. आधी विश्वास संपादन करायचा आणि मग क्रूरपणे हत्या करून एखाद्याची लुबाडणूक करायची हा त्याचा डाव्या हातचा खेळ. ड्रग म्हणून विषारी पदार्थ देऊन त्याने अनेक हत्या करून त्यांना लुटले. यात तरुणींचे प्रमाण अधिक होते. आकर्षक व्यक्तिमत्व, सफाईदार संभाषण, मदत करण्याचे सोंग याची भुरळ पडून अनेकजणी त्याच्या नादाला लागल्या आणि यमसदनी गेल्या. तुरुंगातील त्याचे वाढदिवस आणि विवाहही गाजला.

अतिशय आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि लाघवी संभाषणकला लाभलेल्या शोभराजची कुणावरही प्रथमदर्शनीच छाप पडत असे. एकदा सावज हेरले की ड्रग म्हणून शोभराज त्याला चक्क विषच द्यायचा. त्याचे सेवन करून सावज बेशुद्ध पडले की, शोभराज त्याचा पासपोर्ट आणि मौल्यवान चीजवस्तू घेऊन पोबारा करायचा. कधी तो कुणाचे पासपोर्ट लपवून ठेवी. पासपोर्ट हरवल्याने चिंतातूर झालेल्या त्या व्यक्तीला तो आपल्याला पासपोर्ट सापडल्याचे सांगून त्याला ते परत करी. त्यामुळे समोरच्यावर त्याची छाप पडे. कधी तो आजारी पडलेल्या विदेशी सावजांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापासून त्यांची सुश्रुषाही करीत असे. पण नंतर संधी मिळताच आपला हिसका दाखवी. चोरलेल्या अनेक पासपोर्टवरील फोटो काढून तो आपले फोटो डकवी. अशाच पासपोर्टच्या जोरावर त्याने अनेक देशांच्या सफरी केल्या. फसवणूक करून हत्या करण्याचे व्यसन त्याला का आणि कसे जडले, या पोलिसांच्या प्रश्नावर त्याचे उत्तर ठरलेले होते. मी मुद्दामहून काही करीत नाहीत. लोकच माझ्या प्रभावाखाली येतात आणि आपोआपच पुढचे सारे घडते, असे तो सांगत असे. अनेक ललना त्याच्या प्रेमात पडत. पण तो कुणाचीही गय न करता आपल्या फायद्यासाठी गळा आवळून अथवा विषारी ड्रग देऊन त्यांची हत्या करायला अजिबात कचरत नसे.

शोभराजचे असेही ‘कार’नामे   

फ्रान्स पोलिसांचे आपल्यावरील लक्ष वाढल्याचे लक्षात येताच एके दिवशी चार्ल्स गाडी घेऊन देशाची सीमा ओलांडतो. १९६९ साली मुंबईत पोहोचतो. इथे राहून भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तानात महागड्या गाड्या चोरून विकण्याचा धंदा चालवतो. शस्त्र विक्रीचाही जोडधंदा असतोच. अस्खलित फ्रेंच आणि इंग्रजी बोलणाऱ्या शोभराजने हिंदी आणि उर्दू भाषाही आत्मसात केलेली. १९७३ च्या सुमारास एका प्रकरणात मुंबई पोलिसांनी पकडून सोडून दिल्यावर तो दिल्लीला पळतो. तिथे अशोका हॉटेलमधील ज्वेलर्सचे शोरुम फोडून त्याने लाखोंचे दागिने लुटले. त्या प्रकरणात तिहार तुरुंगात असताना आजारी असल्याचा बहाणा करीत हॉस्पिटलमध्ये दाखल होतो. तेथून पळ काढून काबूल गाठतो. काबूल पोलिसांनीही पकडल्यानंतर सुटका करून घेत बँकॉकला जातो. १९७३ ते १९७५ या कालावधीत थायलंडमध्ये घातक नशिले पदार्थ देऊन, गळा आवळून अथवा जाळून त्याने २४ हत्या केल्याचा आरोप होता. यात अनेक बिकिनी घातलेल्या मुली असल्याने त्याला बिकिनी किलर हे नाव पडले. 

तिहारमधून शोभराज का पळाला?  
  
वास्तविक शोभराज पकडला गेल्याने आनंदात असलेल्या पोलिसांना त्याची चाल समजली नव्हती. १९८८ साली तिहार तुरुंगातील शिक्षेचा कालावधी संपल्यानंतर त्याचा ताबा आपल्याला मिळावा, अशी विनंती थायलंड सरकारने भारताला केली होती. तेथे त्याची मृत्यूदंडाची शिक्षा अटळ होती. पण थायलंडच्या नियमानुसार वॉरंट जारी करून वीस वर्षात आरोपी हाती आला नाही तर ते प्रकरणच रद्दबातल होते. म्हणूनच भारतातील मुक्काम आणखी वाढवण्यासाठी तिहारमधून पळाला आणि गोव्यात जाऊन पोलिसांची वाट पाहत राहिला. पळून जाण्याच्या गुन्ह्यामुळे त्याचा भारतातील मुक्काम वाढला आणि मृत्यूदंडाची शिक्षाही टळली. केवळ तुरुंगातील मुक्काम वाढावा यासाठी तुरुंगातून पळणारा चार्ल्स शोभराज हा जगातील एकमेव आरोपी असावा.   
 
पोरसवदा वयातच गुन्हेगारी मार्गावर... 

ठग ऑफ हिंदुस्तान नटवरलाल त्याच्यानंतर चलाख आणि खतरनाक गुन्हेगार म्हणून चार्ल्स शोभराजचे नाव घेतले जाते. त्याचा जन्म १९४४ सालचा.  व्हिएतनाममध्ये. वडील भारतीय तर आई व्हिएतनामी. शोभराजच्या जन्मानंतर त्याचे वडील भारतात परतले. त्याच्या आईने मग फ्रेंच आर्मी लेफ्टनंटसोबत विवाह केला आणि चार्ल्स शोभराज आईसह पॅरिसला पोहोचला. त्याला फ्रान्सचे नागरिकत्व मिळाले. खऱ्या वडिलांनी आपल्याला धोका दिला आणि सावत्र वडील सापत्न वागणूक देतात, याची सल त्याला कायमच राहिली. यातूनच तुटकपणाची भावना बाळगणारा चार्ल्स शोभराज पोरसवदा वयातच गुन्हेगारीकडे वळला. पॅरिसमध्ये गाडी चोरण्याचा पहिला गुन्हा त्याच्या नावावर जमा होऊन आठ महिन्यांची शिक्षाही झाली. पण त्यानंतर फ्रान्समधले ड्रग पेडलर, माफिया टोळ्या गुन्हेगारी जगतातला त्याचा वावर वाढतच गेला.

पोलिसांना मिठाई देऊन काढला पळ    

१९७६ साली पकडून त्याला तिहार तुरुंगात ठेवण्यात येते. त्याला बारा वर्षे कारावासाची शिक्षा होते. म्हणजे १९८८ साली त्याची सुटका होणार होती. पण १९८६ साली शोभराज तुरुंग कर्मचाऱ्यांना वाढदिवसाचे निमित्त करीत गुंगीचे औषध टाकलेली मिठाई खिलवून फरार होतो. मुंबई पोलिस आठ दिवसांत त्याला गोव्याच्या ओ कोकेरीओ हॉटेलमध्ये आरामात बसलेला असताना पकडतात. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: charles sobhraj how to become a cold blooded bikini killer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.