आत्महत्येसाठी सौरभने वापरले कमांडो चार्लीचे पिस्तूल
By admin | Published: February 21, 2015 12:50 AM2015-02-21T00:50:44+5:302015-02-21T00:50:44+5:30
पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ, विभागीय चौकशीचे आदेश : उपचारादरम्यान सौरभचा मृत्यू
Next
प लीस कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ, विभागीय चौकशीचे आदेश : उपचारादरम्यान सौरभचा मृत्यूनागपूर : व्यसनमुक्ती केंद्रात स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या करणाऱ्या सौरभ सुरेश शर्मा याने कमांडो चार्लीच्या पिस्तूलचा वापर केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्याचा शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला. हा कमांडो चार्ली गिट्टीखदान पोलीस ठाण्यातील हेमंत गोतमारे आहे. या प्रकरणात आज गिट्टीखदान पोलिसांनी हेमंत गोतमारेची दिवसभर चौकशी केली. पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांना या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी सोपविली आहे. गुरुवारी रात्री फ्रेंड्स कॉलनी येथील रहिवासी सौरभ शर्मा याने एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मैत्री व्यसनमुक्ती केंद्रात स्वत:वर गोळी झाडली होती. त्याच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू होते. शुक्रवारी पहाटे सौरभचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळावरील सौरभने वापरलेली बंदूक ताब्यात घेतली. सौरभच्या कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याचा गिट्टीखदान ठाण्यातील कमांडो चार्ली हेमंत गोतमारे याच्याशी मैत्री असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी हेमंतला विचारणा केली असता, त्याने बंदूक स्वत:ची असल्याची कबुली दिली. हेमंत हा फ्रेंड्स कॉलनी येथे राहत होता. सौरभला दारुचे व्यसन होते. म्हणून त्याच्यावर व्यसनमुक्ती केंद्रात उपचार सुरू होते. हेमंतला सुद्धा दारुचे व्यसन होते. त्यामुळे त्यांच्यात घनिष्ठ मैत्री होती. हेमंत गेल्या तीन वर्षापासून गिट्टीखदान ठाण्यात चार्ली आहे. घटनेच्या दिवशी हेमंत कर्तव्यावर होता. कर्तव्यावर असतानाही त्याने सौरभला स्वत:ची बंदूक दिल्याचे निष्पन्न झाले. यापूर्वीही त्याला कर्तव्यात लापरवाही केल्यावरून निलंबित केले होते. घटनेच्या दिवशी सौरभ व हेमंतने सोबत दारू घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर सौरभ बंदूक घेऊन व्यसनमुक्ती केंद्रात गेला. त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. त्याने कानपटीवर बंदूक ठेवली. केंद्राचे संचालक पाध्ये यांनी त्याला थांबविण्याचा भरपूर प्रयत्न केला. पाध्ये यांनी सौरभकडून बंदूक हिसकावून घेतली. त्यामुळे सौरभ आणखी चिडला, त्याने बंदूक हिसकावून स्वत:वर गोळी झाडून घेतली. सौरभवर बऱ्याच वर्षापासून उपचार सुरू होते. घटनेनंतर सौरभवर बजाजनगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याच्या मृत्यूनंतर अंबाझरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.