चार प्रवाशांसाठी भाड्याने घेतले विमान; मध्य प्रदेशमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 01:03 AM2020-05-30T01:03:43+5:302020-05-30T01:03:57+5:30
मद्यनिर्मिती कंपनीच्या मालकाचा अजब निर्णय
भोपाळ : मध्य प्रदेशमधील सोम डिस्टिलरीज या मद्यनिर्मिती कंपनीचे मालक जगदीश अरोरा यांनी आपली मुलगी, दोन नातू व त्यांची दाई अशा चौघांना भोपाळहून दिल्लीला रवाना करण्यासाठी १८० आसनांची क्षमता असलेले एअरबस ए३२० हे प्रवासी विमान बुधवारी भाड्याने घेतले होते. या प्रवासासाठी तब्बल २५ ते ३० लाख रुपये खर्च करण्यात आल्याची चर्चा आहे.
लॉकडाऊनमध्ये विविध ठिकाणी अडकून पडलेले लाखो मजूर हे रेल्वे, बस किंवा मिळेल त्या वाहनाने अथवा पायी चालत गावाला जात असतानाच ही घटना घडली आहे. चार नातेवाईकांसाठी संपूर्ण विमान भाड्याने घेतल्याचा जगदीश अरोरा यांनी इन्कार केला आहे. दुसऱ्यांच्या वैयक्तिक गोष्टीत इतके नाक का खुपसता, असा सवाल त्यांच्याशी पत्रकारांना अरोरा यांनी केला.
दिल्लीहून हे विमान भाड्याने घेण्यात आले. बुधवारी हे विमान दिल्लीहून सकाळी साडेनऊला निघाले व भोपाळमध्ये सकाळी साडेदहा वाजता पोहोचले. भोपाळहून हे विमान सकाळी साडेअकरा वाजता निघाले. भोपाळहून अरोरा यांच्या चारच नातेवाईकांना हवाईमार्गे दिल्लीला जाण्यासाठी १८० आसनी विमानाऐवजी सहा ते आठ आसनी छोटे विमानही भाड्याने घेता आले असते.
दर तासाचे भाडे ५ ते ६ लाख रुपये : कोरोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीमुळे श्रीमंतवर्गातील काही लोक इतरांबरोबर प्रवास करण्यास राजी होत नाहीत. त्यातूनच एअरबससारखे विमान भाड्याने घेण्याचा निर्णय झाला असावा, असे नागरी हवाई वाहतूक खात्याच्या सूत्रांनी सांगितले. १८० आसनांचे एअरबस ए ३२० विमानाचे दर तासाचे भाडे पाच ते सहा लाख रुपये आहे. इंधनाच्या किमतीनुसार विमानाची भाडे आकारणी के ली जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे इंधनाच्या दरही कमी झाले आहेत.