खळबळजनक! मणिपूरमध्ये माजी आमदाराच्या घरी बॉम्बस्फोट, पत्नीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 13:20 IST2024-08-11T13:19:57+5:302024-08-11T13:20:45+5:30
मणिपूरच्या सैकुलचे माजी आमदार यमथोंग हाओकीप यांच्या कांगपोकपी जिल्ह्यातील घरी बॉम्बस्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

फोटो - ABP News
मणिपूरच्या सैकुलचे माजी आमदार यमथोंग हाओकीप यांच्या कांगपोकपी जिल्ह्यातील घरी बॉम्बस्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये त्यांच्या पत्नी चारुबाला हाओकीप यांचा मृत्यू झाला. मणिपूर पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.
५९ वर्षीय चारुबाला हाओकीप या मैतेई समुदायातील होत्या आणि कुकी-झोमी-वर्चस्व असलेल्या कांगपोकपी जिल्ह्यातील एकौ मुलाममध्ये राहत होत्या. ६४ वर्षीय यमथोंग हाओकिप यांनी २०१२ आणि २०१७ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर दोनदा सैकुलची सीट जिंकली होती. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता.
या घटनेची माहिती देताना कांगपोकपी जिल्ह्याच्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, ही घटना शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली, मात्र शनिवारी सकाळी याची माहिती मिळाली. घरातील कचऱ्यामध्ये आयईडी ठेवण्यात आला होता, तिथेच स्फोट झाला. याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. कौटुंबिक वादातूनही हा हल्ला झाला असावा, अशी शंका पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केली.
या प्रकरणाबाबत पोलीस अधिकारी पुढे म्हणाले की, माजी आमदाराने आपल्या काकाच्या नातवाच्या शेजारी काही जमीन खरेदी केली होती आणि त्यावरून वाद झाला होता. त्याचा याच्याशी संबंध असल्याचा आम्हाला संशय आहे. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. गुन्हेगाराला लवकरात लवकर पकडले जाईल. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.