मुलगी बनून फोनवरून वर्षभर मारल्या गप्पा, ‘ड्रीम गर्ल’ समोर येताच तरुणाला बसला ४४० व्होल्टचा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 11:24 AM2023-03-03T11:24:33+5:302023-03-03T11:25:26+5:30
Crime News: फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका तरुणाने तरुणीचा आवाज काढून एका सरकारी शाळेतील शिक्षकाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
छत्तीसगडमधील जशपूर येथून फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका तरुणाने तरुणीचा आवाज काढून एका सरकारी शाळेतील शिक्षकाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. जवळपास दीड वर्ष त्याच्यासोबत प्रेमाचं नाकं केलं. एवढंच नाही तर त्याला लग्नाचीही ऑफर दिली. जेव्हा हा शिक्षक पूर्णपणे आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढला गेला आहे याची खात्री पटली तेव्हा या लबाडाने त्या शिक्षकाकडून तब्बल ५ लाख ६० हजार रुपये उकळले.
पीडित शिक्षकाने सांगितले की, त्याने मला भेटायला बोलावले. पहिल्यांदा आपल्या ड्रीम गर्लला भेटण्यासाठी जायचं असल्याने मी खूप उत्साहित होतो. मी तिच्यावर आतापर्यंत लाखो रुपये खर्च केले होते. मात्र मला जेव्हा समजले की माझी प्रेयसी मुलगी नाही तर मुलगा आहे, तेव्हा मला धक्का बसला. त्यानंतर मी त्वरित याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिसांनी सांगितले की, पीडित शिक्षक विद्याचरण पैकरा रायगड जिल्ह्यातील लैलुंगा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहे. त्याने फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. तपासामध्ये विद्याचरण हा जिला आपली प्रेयसी समजून फोनवर बोलायचा ती मुलगी नसून मुलगा असल्याचे समोर आले. या तरुणाने ड्रीम गर्ल बनून शिक्षकासह अनेकांना ब्लॅकमेल केलं आहे.
विद्याचरण पैकरा याने आपल्या तक्रारीत सांगितले की, नोव्हेंबर २०२१ मध्ये त्याची ओळख सरिता पैकरा नावाच्या तरुणीशी झाली होती. स्वत:ची ओळख सविता अशी करून देणाऱ्या आरोपीने आपण धरमजयगड ब्लॉकमध्ये शिक्षक असल्याचे सांगितले. सदर आरोपी मुलीचा आवाज एवढा हुबेहूब काढण्यात पटाईत होता की समोरचा त्याच्या आवाजाच्या जादूमध्ये फसून जायचा.
आरोपीने तरुणी बनूव फिर्यादीकडून ५ लाख रुपयांहून अधिकची रक्कम उकळली. पोलिसांनी आरोपीविरोधात कलम ४२० आणि आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद केला. त्यानंतर आरोपीवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास करून पुढील कारवाई केली जाईल.