चतुर्वेदी, गुप्ता मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2015 11:21 PM2015-08-31T23:21:33+5:302015-08-31T23:21:33+5:30
भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणारे भारतीय सनदी अधिकारी संजीव चतुर्वेदी आणि ग्रामीण भागातील महिलांच्या प्रश्नावर अखंड कार्य करणारे अंशू गुप्ता यांना आज मॅगसेसे
मनिला : भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणारे भारतीय सनदी अधिकारी संजीव चतुर्वेदी आणि ग्रामीण भागातील महिलांच्या प्रश्नावर अखंड कार्य करणारे अंशू गुप्ता यांना आज मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मॅगसेसे पुरस्कार हा आशियातील नोबेल पुरस्कार म्हणूनही गणला जातो. फिलिपीनचे राष्ट्रपती बेनिग्नो सिमोन कोजुआंग्वो एक्विनो यांनी सुवर्णपदक देऊन चतुर्वेदी आणि गुप्ता यांचा सन्मान केला.
संजीव चतुर्वेदी हे २००२ च्या आयएफएस बॅचचे अधिकारी आहेत. प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. फिलिपीनची राजधानी मनिला येथे पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना एम्सचे उपसचिव असलेले चतुर्वेदी म्हणाले की, प्रामाणिकपणे कार्य करताना मिळालेला हा पुरस्कार निश्चितच मनोबल वाढविणारा आहे. भारताच्या लोकसंख्येचा मोठा भाग हा १५ ते ३५ वर्षे वयोगटातील आहे. प्रशासनातील पारदर्शकता आणि भ्रष्टाचार निर्मूलनासाठी हा तरुण वर्ग उत्सुक आहे. प्रामाणिकपणा, साहस आणि सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश यासाठी चतुर्वेदी यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
अंशू गुप्ता यांनी १९९९ मध्ये २७ व्या वर्षी कॉर्पोरेट सेक्टरमधील नोकरीवर पाणी सोडत गुंज ही संस्था स्थापन केली. गरिबांना कपडे पुरविण्यासोबतच ही संस्था गरीब महिलांना सॅनिटरी पॅड पुरविते. आपल्याला गरिबीविरुद्धची लढाई लढायची असून तेच सर्वात मोठे आव्हान आहे, असे गुप्ता यावेळी म्हणाले. (वृत्तसंस्था)