स्वस्तात तीर्थयात्रा; रेल्वेचा रोजचा खर्च ८३० रुपये
By admin | Published: May 16, 2016 03:51 AM2016-05-16T03:51:15+5:302016-05-16T03:51:15+5:30
विविध तीर्थस्थळांचे दर्शन अत्यंत कमी खर्चात घेता यावे यासाठी यंदाच्या मे महिन्यापासून भारतीय रेल्वेने ‘भारत दर्शन ट्रेन’ सेवा सुरू केली
नवी दिल्ली : भारतातल्या भाविक यात्रेकरूंना देशातल्या विविध तीर्थस्थळांचे दर्शन अत्यंत कमी खर्चात घेता यावे यासाठी यंदाच्या मे महिन्यापासून भारतीय रेल्वेने ‘भारत दर्शन ट्रेन’ सेवा सुरू केली आहे. या यात्रेसाठी प्रत्येक प्रवाशाला दररोज फक्त ८३0 रूपयांचे प्रवास भाडे आकारले जाणार आहे.
या ‘भारत दर्शन ट्रेन’ने तूर्तास पूर्व आणि उत्तर भारतातील महत्वाच्या तीर्थस्थळांना भेट देणे यात्रेकरूना शक्य होणार आहे. पुढील महिनाभरात मध्य, पश्चिम व दक्षिण भारतातील तीर्थक्षेत्रांसाठीही अशी रेल्वेसेवा सुरु होईल, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रौंनी दिली.
भारतीय रेल्वेच्या भारत दर्शन योजनेनुसार पहिली ट्रेन ८ मे रोजी चंदिगडहून रवाना झाली असून पुढची ट्रेन २३ मे रोजी सुटणार आहे. प्रत्येकी दहा डब्यांची ही ट्रेन चंदिगडहून दिल्ली, अयोध्या, वाराणसी, गया मार्गे बैद्यनाथधामहून जगन्नाथपुरी मार्गे श्रीगंगासागरला पोहोचणार आहे.
भारतातल्या तीर्थस्थळांची बजेट फ्रेंडली यात्रा यात्रेकरूंना यापुढे अतिशय नाममात्र रकमेत करण्याची सुविधा देशातल्या विविध भागात जाणाऱ्या भारत दर्शन ट्रेन्समुळे उपलब्ध होणार आहे. शिर्डी तिरूपतीसह दक्षिण भारत तसेच देशातल्या ७ ज्योतिर्लिंगाना भेट देणाऱ्या यात्रेच्या पॅकेजसोबत तर रस्ता मार्गाने बसेसचा प्रवास, निवास व भोजन या सुविधाही यात्रेकरूंना या पॅकेजमधेच मिळणार आहेत.
दि. २७ जूनला चंदिगडहून सुटणारी ‘भारत दर्शन ट्रेन’ दिल्ली मार्गे शिर्डी, तिरूपती, कांचीपूरम, रामेश्वरम, मदुराई, कन्याकुमारी, म्हैसुर, बंगलुरूला भेट देईल तर ७ ज्योतिर्लिंगाना भेट देणारी ट्रेन चंदिगडहून दिल्लीमार्गे उज्जैन(महांकालेश्वर व ओंकारेश्वर), व्दारका, सोमनाथ, औरंगाबाद व त्र्यंबकेश्वर (नाशिक)ची यात्रा घडवणार आहे. प्रत्येक ट्रेनमधे प्रशिक्षित टूर व्यवस्थापक यात्रेकरूंच्या सेवेत असतील, असेही रेल्वेच्या सूत्रांनी सांगीतले. (विशेष प्रतिनिधी)