खासगी कंपन्यांचे पेट्राेल स्वस्त; सरकारी कंपन्या कधी करणार दरकपात?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 06:02 AM2023-05-02T06:02:32+5:302023-05-02T06:03:08+5:30
रिलायन्स बीपी, नायरा एनर्जी आणि शेल या कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीनुसार इंधन विक्री सुरू केली आहे.
नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी हाेऊ लागल्यानंतर पेट्राेल आणि डिझेलचे दर घटण्याची शक्यता बळावली आहे. खासगी क्षेत्राती तेल कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारानुसार पुन्हा पेट्राेल व डिझेलची विक्री सुरू केली आहे. सरकारी तेल कंपन्यांपेक्षा एक रुपया कमी किमतीने येथे पेट्राेल विकण्यात येत आहे, याचे अनुकरण सरकारी तेल कंपन्या करू शकतात. तसे झाल्यास पेट्राेल व डिझेलचे दर घटू शकतात.
रिलायन्स बीपी, नायरा एनर्जी आणि शेल या कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीनुसार इंधन विक्री सुरू केली आहे. वर्षभरानंतर प्रथमच इंधनची किंमत बाजाराशी जाेडण्यात आली आहे. गेल्या वर्षी इंधनाच्या किमती भडकल्या हाेत्या. त्यावेळी या कंपन्यांनी सरकारी तेल कंपन्यांपेक्षा काही प्रमाणात जास्त दराने इंधनविक्री केली. गेल्या वर्षी नाेव्हेंबर महिन्यापासून देशात पेट्राेल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.
रशियाकडून मिळणारी सवलत चीनने ओढली
रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्यामध्ये भारताला चीनच्या कंपन्या जाेरदार स्पर्धा करत आहेत. १६.३१ लाख बॅरल्स कच्चे तेल रशियाकडून भारताने एप्रिलमध्ये दरराेज आयात केले. १९.१ लाख बॅरेल्स एवढी कच्च्या तेलाची आयात चीनने फेब्रुवारी आणि मार्चमध्ये दरराेज केली. १५ ते २० डाॅलर्स एवढी सवलत भारताला मिळत हाेती. ती आता सरासरी आठ डाॅलर्स एवढीच मिळत आहे.
तेल कंपन्या नफ्यात
पेट्राेल-डिझेल विक्रीतून सरकारी तेल कंपन्या गेल्या महिन्यात अनुक्रमे ८.७ आणि ११.१ रुपये प्रति लिटर एवढा सरासरी नफा कमवित हाेत्या. ताेट्यात असूनही किमती स्थिर ठेवल्यामुळे सरकारने तेल कंपन्यांना अनुदानही दिले आहे.
युक्रेन युद्धानंतर वाढले इंधनदर
युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर गेल्या वर्षी कच्च्या तेलाचे दर १४० डाॅलर्स प्रतिबॅरलवर गेले हाेते. त्यावेळी देशात पेट्राेल व डिझेल दर उच्चांकी पातळीवर पाेहाेचले. त्यानंतर केंद्राने उत्पादन शुल्क तर बहुतांश राज्यांनी व्हॅट कमी करून जनतेला दिलासा दिला.
साैदी अरब व ओपेक देशांनी मे महिन्यापासून कच्च्या तेलाचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कच्चे तेल पुन्हा महाग हाेण्याची शक्यता आहे. कपातीचा निर्णय जाहीर केला हाेता, त्यावेळी कच्च्या तेलाचे दर ८५ डाॅलर्स प्रति बॅरेलपर्यंत वाढले हाेते. नंतर घसरण झाली आहे.