एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचा हेतू तपासा

By admin | Published: November 22, 2015 01:47 AM2015-11-22T01:47:40+5:302015-11-22T01:47:40+5:30

गोव्यात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला जगभर नावाजले जाते. अशा महोत्सवात गोंधळ घालणाऱ्या एफटीआयआयच्या काही विद्यार्थ्यांमुळे आंतरराष्ट्रीय

Check the motives of FTII students | एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचा हेतू तपासा

एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचा हेतू तपासा

Next

- संदीप आडनाईक,  पणजी

गोव्यात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला जगभर नावाजले जाते. अशा महोत्सवात गोंधळ घालणाऱ्या एफटीआयआयच्या काही विद्यार्थ्यांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर महोत्सवाला गालबोट लागू नये. या विद्यार्थ्यांच्या या जाणीवपूर्वक करण्यात आलेल्या कृत्याचा हेतू तपासा, असे आवाहन माहिती व प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धनसिंग राठोड यांनी शनिवारी येथे केले.
४६व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी कर्नल राठोड येथे आले आहेत. त्यांची प्रस्तुत प्रतिनिधीने संवाद साधला, तेव्हा त्यांनी चित्रपट व्यवसायाशी संबंधित काही गोष्टींबाबत भूमिका स्पष्ट केली. फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या (एफटीआयआय) विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या प्रकाराबद्दल कर्नल राठोड म्हणाले की, भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर मलिन करण्याचा प्रयत्न हा निंदाजनक आहे. विशेषत: भारतीय व्यक्तींकडूनच तसा प्रकार होणार असेल, तर कठोर कारवाई ही व्हायलाच हवी. त्यात मी स्वत: हस्तक्षेप करणार नाही; पण अशा प्रकाराची मी अपेक्षाच केली नव्हती.
जेम्स बाँडच्या ‘स्पेक्टर’ आणि यशराज फिल्मस्च्या ‘तितली’ यासारख्या चित्रपटांतील संवादांना तसेच काही दृश्यांना कात्री लावण्यात आल्याच्या मुद्द्यावरही कर्नल राठोड यांना विचारले असता ते म्हणाले की, सेन्सॉर बोर्डाचे मुख्य काम हे प्रमाणपत्र देण्याचे आहे. ज्या चित्रपटाची निर्मिती झाली, त्यांना प्रमाणपत्र द्या; पण त्यांच्या विचारांवर आक्षेप घेण्याचा मुळातच बोर्डाला अधिकार नाही आणि त्यात सरकार हस्तक्षेपही करीत नाही.

सेन्सॉर बोर्ड पारदर्शक
सेन्सॉर बोर्डाचे कामकाज अधिक पारदर्शक करण्यात येत आहे. ही प्रक्रिया आम्ही आता आॅनलाइन सुरू करत आहोत. याशिवाय प्रमाणपत्राची प्रतही तत्काळ पीडीएफ फॉर्मेटमध्ये देण्यात येणार आहे. चित्रपट निर्मात्यांच्या अधिकारावर गदा येऊ नये, यासाठी काळजी घेतली जाईल. येत्या पाच वर्षांत सॉफ्टवेअरमध्येही आमूलाग्र बदल करण्यात येतील, असेही राठोड यांनी सांगितले.

नवा सिनेमॅटोग्राफ अ‍ॅक्ट लवकरच
जुन्या काळापासून चालत आलेल्या सिनेमॅटोग्राफ अ‍ॅक्टमध्ये आम्ही बदल करण्याचा विचार करत आहोत. त्यावर तज्ज्ञांशी आणि चित्रपट क्षेत्रातील नामवंतांशी चर्चा केल्यानंतर त्याचे नवीन कायद्यात बदल करण्यात येईल, अशी माहितीही कर्नल राठोड यांनी दिली.

...तर निहलानी यांच्यावर
कारवाई - कर्नल राठोड
सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी केलेल्या काही विधानांवरून गदारोळ उठला आहे. त्यांच्यावर कारवाई करणार का, असा प्रश्न
विचारला असता कर्नल राठोड यांनी सांगितले की, याची माहिती घेईन. व्यक्तिगत पातळीवर त्यांनी काही विधान केले असेल तर त्यावर सरकारचे काही नियंत्रण असणार नाही; कारण तो भाषास्वातंत्र्यांचा भाग आहे; परंतु सेन्सॉर बोर्डाशी संबंधित काही वक्तव्य त्यांनी केले असेल तर देश आणि जनतेच्या हितासाठी त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत विचार करू.

Web Title: Check the motives of FTII students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.