‘डीएचएफएल’च्या वाधवान यांची आरोग्य तपासणी करा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 06:22 AM2022-11-04T06:22:16+5:302022-11-04T06:22:23+5:30
येस बँकेच्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात वाधवान याच्यावर काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप आहे.
नवी दिल्ली : दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे (डीएचएफएल) माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) कपिल वाधवान यांच्या आरोग्याची तपासणी करा, त्यासाठी डॉक्टरांंचा चमू तयार करा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या (एम्स) संचालकांना दिले.
येस बँकेच्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात वाधवान याच्यावर काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप आहे. न्यायमूर्ती के.एम. जोसेफ आणि हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने वाधवान याला तत्काळ एम्समध्ये नेण्याचे आणि विविध विभागांच्या डॉक्टरांकडून तपासणी करण्याचे आदेश दिले. वैद्यकीय तपासणीचा अहवाल आठवडाभरात सादर करण्यासही न्यायालयाने सांगितले.
सर्वोच्च न्यायालयात १० नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी न्यायालयात वाधवानची बाजू मांडली. वाधवानवर पाच शस्त्रक्रिया झाल्या आहेत, त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव त्यांना तत्काळ जामीन द्यावा, अशी मागणी केली.