मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल विविध कामांचा जयघोष
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 05:49 AM2023-05-24T05:49:33+5:302023-05-24T05:49:43+5:30
मोदी सरकारची नऊ वर्षे पूर्ण होण्याची जवळपास सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सरकारच्या १०० मोठ्या कामांवर एक पुस्तिकाही तयार करण्यात आली आहे.
- संजय शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण होत असून, अयोध्येतील राम मंदिर, कलम ३७०, तीन तलाक, सर्जिकल स्ट्राईकपासून ते कोरोना लसीपर्यंत मोदी सरकारच्या कामांचा देशभरात जयघोष करण्याची तयारी सुरू झाली आहे. देशातील सर्व जिल्ह्यांत मोदी सरकारच्या कामांवर तयार केलेली पुस्तिका पाठविली जाईल व प्रत्येक जिल्ह्यात याबाबत एक पत्रकार परिषदही घेण्यात येईल.
मोदी सरकारची नऊ वर्षे पूर्ण होण्याची जवळपास सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सरकारच्या १०० मोठ्या कामांवर एक पुस्तिकाही तयार करण्यात आली आहे. २५, २६ मे रोजी या पुस्तिकेवर माध्यमांना पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दाखविण्यात येणार आहे. नऊ वर्षांत भारत किती बदलला आहे, देश कोठून कोठे पोहोचला आहे, जगात भारताची ताकद व मान किती वाढला आहे, हे सर्व यात सांगितले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर २०२४ साठी कोणीही तोडीस तोड नाही, हे दाखविण्यासाठी हा सर्व प्रयत्न आहे. त्याचबरोबर कर्नाटकच्या पराभवाचा भाजप व मोदींना काहीही फरक पडणार नाही, हेही सांगितले जाणार आहे.
मोदी सरकारचे सर्व मंत्री, भाजपचे सर्व नेते, खासदार जनतेमध्ये जाणार आहेत व ही कामे सांगणार आहेत. मोदी सरकारच्या याच कामांच्या उपलब्धींवर २०२४ मध्ये भाजप निवडणूक लढवणार आहे. देशभरात पत्रकार परिषदा, जनसंवाद, सेमिनार, जाहीर सभा हाेतील. एकूणच ही सर्व तयारी नऊ वर्षांची कामे सांगण्यापेक्षा २०२४ च्या तयारीसाठी असल्याचे जास्त दिसते.
या मुद्द्यांवर लढविणार निवडणूक
मोदी सरकारच्या ज्या मोठ्या कामांवर २०२४ ची निवडणूक लढविली जाणार आहे, त्यात अयोध्येतील राम मंदिर, काश्मीरमधील कलम ३७० हटविणे, पाकिस्तानविरोधात सर्जिकल स्ट्राईक, कोरोनाच्या विरोधातील लढाई जिंकणे, कोरोना लस भारतात तयार करणे, ८० कोटी लोकांना मोफत रेशन देणे, १२ कोटी घरांत पिण्याचे पाणी पोहोचविणे, स्वयंपाकाचा गॅस प्रत्येक घरी पोहोचविणे, ५० कोटींपेक्षा जास्त बँक खाती उघडणे, मनरेगाला डीबीटीशी जोडणे, पीक विमा योजनेची व्याप्ती वाढविणे यांसारख्या योजनांचा यात समावेश आहे. मोदी सरकारच्या मंत्रालयाच्या योजना व कामांचाही यात समावेश केला आहे.