कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्ते आले अन् इतक्या युवांना मिळाला रोजगार! कसा जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 02:37 PM2022-11-23T14:37:52+5:302022-11-23T14:38:13+5:30
मोदी सरकारच्या या निर्णयाची दुसरी बाजू म्हणजे या प्रोजेक्टमुळे भारतात बऱ्याच कालावधीनंतर चित्ते तर आलेच. पण या प्रोजेक्टमुळे अनेक युवकांना रोजगार देखील प्राप्त झाला आहे.
कुनो राष्ट्रीय उद्यानात प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत भारतात चित्ते आणण्यात आले. मोदी सरकारच्या या निर्णयाची दुसरी बाजू म्हणजे या प्रोजेक्टमुळे भारतात बऱ्याच कालावधीनंतर चित्ते तर आलेच. पण या प्रोजेक्टमुळे अनेक युवकांना रोजगार देखील प्राप्त झाला आहे. कुनो राष्ट्रीय उद्यानाद्वारे एका खासगी संस्थेच्या तज्ज्ञांच्या माध्यमातून ३० आदिवासी युवकांसह एकूण ६० जणांना गाइडची नोकरी मिळणार आहे. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात उमेदवारांची निवड देखील झाली आहे. हे सर्व तरुण राष्ट्रीय उद्यानाच्या आजूबाजूच्या गावांतील आहेत.
एकूण ६० युवकांचं ट्रेनिंग एक आठवड्याआधी वेगवेळ्या ठिकाणी जसं की आग्रा आणि सेसईपुरा इत्यादी ठिकाणी झालं आहे. ट्रेनिंगनंतर हे ६० तरुण कुनो उद्यानात येणाऱ्या पर्यटकांचे गाइड म्हणून काम करणार आहेत. उद्यानाची महत्वाची माहिती पर्यटकांना देण्याचं काम ते करणार आहेत.
ट्रेनिंगमध्ये युवकांना कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या स्थापनेसोबतच इतरही माहिती दिली गेली. नामिबियातून आणण्यात आलेल्या ८ चित्ते आणि इतर वन्यजीवांचीही माहिती निवड झालेल्या युवकांना दिली जात आहे. देश-परदेशातून येणाऱ्या पर्यटकांना अचूक आणि जास्तीत जास्त माहिती देण्याच्या उद्देशानं या सर्वांचं ट्रेनिंग केलं जात आहे.
कुनो राष्ट्रीय उद्यानाचे डीएफओ प्रकाश कुमार वर्मा यांच्या माहितीनुसार गाइड प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जात आहे. ज्यात लास्ट बिल्डर्नस फाऊंडेशनद्वारे आम्ही ६० तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी गाइडचं प्रशिक्षण दिलं आहे. यात बंगळुरूचे डॉक्टर अर्जून, मुंबईतून केदार भिडे, गौरव सिरोडकर यांच्याकडून प्रशिक्षण देण्यात आलं आहे.
कुनो राष्ट्रीय उद्यान देशातील पहिलं चित्ता सेंच्युरी म्हणून विकसीत केलं जात आहे. इथं देशात ७० वर्षांनंतर चित्ते आणण्यात आले आहेत. येणाऱ्या काळात भारतात पुन्हा एकदा चित्त्यांची संख्या वाढेल आणि ते पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतील अशी आशा आहे.