केमोविना कर्करोग बरा करणार

By admin | Published: May 16, 2016 05:04 AM2016-05-16T05:04:11+5:302016-05-16T05:04:11+5:30

एक अभिनव तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दृष्टीने येथील ‘इंडियन इस्टिट्यूट आॅफ सायन्स’च्या वैज्ञानिकांनी आश्वासक प्रगती केली आहे.

Chemovina cure cancer | केमोविना कर्करोग बरा करणार

केमोविना कर्करोग बरा करणार

Next

बंगळुरू : अत्यंत क्लेषदायक असे ‘साईड इफेक्ट’ होणाऱ्या केमोथिरपीविना विविध प्रकारचे कर्करोग बरे करण्याचे एक अभिनव तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दृष्टीने येथील ‘इंडियन इस्टिट्यूट आॅफ सायन्स’च्या वैज्ञानिकांनी आश्वासक प्रगती केली आहे.
या संस्थेच्या ‘सेंटर फॉर नॅनो सायन्स अ‍ॅण्ड इंजिनियरिंग’मधील (सीईएनएसई) वैज्ञानिकांच्या चमुने रुग्णाच्या शरिरातील कर्करोगग्रस्त अवयवाच्या बाधित पेशींना अत्यंत सुक्ष्म अशा ‘नॅनो व्हॉयेजर्स’द्वारे थेट औषध पोहोचविण्याचे तंत्र विकसित केले आहे. हे औषधवाहक ‘नॅनो व्हॉयेजर्स’ पाच नॅनोमीटर एवढ्या सुक्ष्म आकाराचे असतात. (एक नॅनोमीटर म्हणजे एक मीटरचा एक अब्जावा भाग). हे ‘व्हॉयेजर्स’ कर्करोगरोधी औषधांच्या अणिकणांनी अवंगुंठित असतात. ते हे औषध थेट बाधित पेशींपर्यंत पोहोचवितात. परिणामी कर्करोगग्रस्त पेशी नष्ट होतात व त्यामुळे कर्करोगाचा प्रसार थांबतो.
या केंद्राच्या वैज्ञानिकांनी सांगितले की, हे तंत्र आम्ही सैद्धांतिकदृष्ट्या विकसित केले आहे. आता या ‘नॅनो व्हॉयेजर्स’व्दारे नेमक्या कोणत्या कर्करोगरोधी औषधाचा वापर करणे सर्वाधिक परिणामकारक ठरेल हे ठरविण्यासाठी आम्ही बंगळुरु येथील ‘किडवई मेमोरियल इन्स्टिट्यूट आॅफ आॅन्कॉलॉजी’मधील कर्करोगतज्ज्ञ आणि काही रेडिएशन तज्ज्ञांच्या मदतीने आणखी काही प्रयोग करणार आहोत.
सेंटरचे सहाय्यक प्राध्यापक व या वैज्ञानिक चमुचे प्रमुख प्रा. अंबरिश घोष यांनी सांगितले की, नेमक्या हव्या त्या पेशींपर्यंत ‘नॅनो व्हॉयेजर्स’ पोहोचविण्यात आम्हाला यश आले आहे. ‘नॅनो व्हॉयेजर्स’नी पेशींमध्ये प्रवेश केल्यावर त्यांचे अचूक मॅपिंगही केले. आमच्यासाठी हे मोठे यश आहे. यावरून या ‘नॅनो व्हॉयेजर्स’मार्फत नेमक्या हव्या त्या पेशींपर्यंत औषध पोहोचविणे शक्य आहे, हे सिद्ध झाले आहे.
सध्या हे प्रयोग प्रामुख्याने उंदराच्या शरिरातून काढलेल्या अवयवांच्या अंशांवर उपचार करून स्कर्व्हायकल व फुफ्फुसाचा कर्करोग बरा करण्याच्या उद्देशाने केले जात आहेत. हेच प्रयोग जेव्हा जिवंत उंदरावर यशस्वी होतील त्यानंतर त्यांच्या मामशांवर चाचण्या घेण्यात येतील. माणसांवर स्कर्व्हायकल व फुफ्फुसाचा कर्करोग बरा करण्यात यश मिळाले की हाच प्रयोग अन्य प्रकारच्या कर्करोगांसाठी केला जाऊ शकेल. (वृत्तसंस्था)
>बाह्य चुंबकीय दिशानिर्देश
औषधांनी अवगुंठित केलेले हे ‘नॅनो व्हॉयेजर्स’ शरीरात टोचल्यानंतर बाहेरून चुंबकीय प्रभावक्षेत्राचा वापर करून ते पूर्वनिधारित पेशींपर्यंत अचूक नेऊन पोहोचविले जातात. हे ‘नॅनो व्हॉयेजर्स’ सिलिकॉन डायोक्साईडचे बनविलेले असतात.
आम्ही जेव्हा पाण्यावर प्रयोग केला तेव्हा ‘नॅनो व्हॉयेजर’ व्यवस्थित प्रवाहित झाले. पण रक्तावर प्रयोग करताना रक्तातील लोहामुळे ‘नॅनो व्हॉयेजर’चे क्षरण होत असल्याचे दिसून आले. असे होऊ नये म्हणून याच संस्थेच्या मटेरियल्स रीसर्च सेंटरचे प्रा. श्रीनिवासराव शिवशंकर यांनी विकसित केलेल्या ‘झिंक फेराईट’च्या अत्यंत पातळ पापुद्र्याचे त्यावर आवरण चढविण्यात आले.
- प्रा. अंबरिश घोष, सहायक प्राध्यापक, सीईएनएसई

Web Title: Chemovina cure cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.