Beirut Blast: भारतातही बैरुतसारख्या स्फोटाचा धोका; सरकारी यंत्रणांनी सुरु केल्या हालचाली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 11:28 AM2020-08-10T11:28:23+5:302020-08-10T11:37:51+5:30
बैरुतमधील भीषण स्फोटाचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
नवी दिल्ली: लेबननची राजधानी असललेल्या बैरूत बंदरावरील एका वखारीत साठवून ठेवण्यात आलेल्या २७५० टन अमोनियम नायट्रेटला आग लागल्याने हा शक्तिशाली स्फोट झाला. या स्फोटात १३० जण ठार, तसेच ५ हजार जण एकूण जखमी झाले आहेत. या भीषण स्फोटाने बैरुत शहरातील अनेक भाग हादरले. ठिकठिकाणांहून धूरांचे प्रचंड लोळ निघत होते. या स्फोटाने संपूर्ण शहराच प्रचंड घबराट पसरली होती.
बैरुतमधील भीषण स्फोटाचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जगभरातून या भीषण स्फोटानंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मात्र आता बैरुतसारखा अमोनियम नायट्रेटचा मोठा साठा भारतातही असल्याचं समोर आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Extraordinary footage of the explosion of Beirut. pic.twitter.com/yBEGzwYeGv
— Saad Mohseni (@saadmohseni) August 4, 2020
तामिळनाडूची राजधानी चेन्नईच्या बाहेर कस्टम विभागाने गेल्या काही वर्षांपासून जवळपास ७४० टन अमोनियम नायट्रेटचा साठा केला आहे. याबद्दल आथा चिंता व्यक्त करण्यात येत आहे. एका अधिकाऱ्याने या साठ्याबाबत माहिती देताना सांगितले की, अमोनियम नायट्रेट भारतातील फटाक्यांची मोठी कंपनी असलेल्या शिवकाशीमधील एका ग्रुपला पाठवण्यात येत होता. तेव्हा २०१५ मध्ये चेन्नईमधील बंदरात हा साठा जप्त केला होता. मात्र हा अमोनियम नायट्रेटचा साठा आजही तसाच गोदामात पडून आहे. तसेच या परिसरात जवळपास १२,००० लोक राहत असल्यामुळे ते सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सुरु करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
बैरुत स्फोटांचं उदाहरण देत अण्णाद्रमुकचे सहकारी पक्ष पीएमकेचे प्रमुख रामदास यांनी अमोनियम नायट्रेटची सुरक्षित विल्हेवाट लावण्याची आणि इतर उत्पादने तयार करण्यासाठी काळजी घेऊन वापर व्हावा, अशी मागणी केली आहे. चेन्नईतील वेअरहाऊसमध्ये अमोनियम नायट्रेटचा स्फोट होण्याची भीती आहे. त्यामुळे अमोनियम नायट्रेटसह स्फोटक पदार्थांची योग्य त्या सुरक्षित पद्धतीने विल्हेवाट लावण्याची मागणी रामदास यांनी केली आहे.