फक्त 250 रुपयांत 'रेनवॉटर हार्वेस्टिंग'; 'या' अवलियानं 10 मिनिटांत साठवलं 225 लिटर पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 04:40 PM2019-07-01T16:40:11+5:302019-07-01T16:40:56+5:30
कडक उन्हाळ्यानंतर आलेल्या पावसाळ्यामुळे लोकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
चेन्नईः कडक उन्हाळ्यानंतर आलेल्या पावसाळ्यामुळे उकाड्यापासून लोकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. उन्हाळ्यात बऱ्याचदा सामान्यांना पाण्याचा प्रश्न भेडसावत असतो. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. अशातच चेन्नईच्या एका अवलियानं पाणी बचतीचा नवा फंडा वापरला आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून त्यानं 250 रुपयांत 10 मिनिटांत 225 लिटर पाणी वाचवलं आहे. चेन्नईतल्या दयानंद कृष्णन या अवलियानं हा अभिनव प्रयोग केला.
दयानंद यानं पीव्हीसी पाइपचा उपयोग करून हे पाणी साठवलं आहे. दयानंद यानं छतावर जमा होणारं पावसाचं पाणी पीवीसी पाइपानं एका ड्रममध्ये सोडलं. अशा प्रकारे दयानंद यानं 10 मिनिटांत 225 लीटर पाणी साठवलं. पाणी वाचवण्याबरोबरच त्यानं ते स्वच्छ करण्याची पद्धतही शोधून काढली. ड्रममध्ये जाणाऱ्या पाइपमध्ये त्यानं फिल्टर बसवलं. जेणेकरून पाण्यातील घाण गाळून स्वच्छ पाणी ड्रममध्ये जाईल. चेन्नईमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्यातच दयानंद कृष्णन यानं राबवलेला प्रयोग इतरांसाठी आदर्श ठरत आहे.
या पाण्यापासून लोक कपडे धुणे आणि भांडी घासण्याबरोबरच इतर कामं करू शकतात. तर दुसरीकडे सबरी टेरेस या सोसायटीतील 56 कुटुंबीय रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून एका तासात 30 हजार लिटर पाणी साठवतात. त्यामुळे दयानंद यानं राबवलेला हा प्रयोग म्हणावा तेवढा खर्चिक नसला तरी पाणी साठवण्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.