बापरे! 535 कोटींची कॅश घेऊन जाणारा ट्रक रस्त्यातच बंद पडला; लोकांची मोठी गर्दी अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 09:37 AM2023-05-18T09:37:29+5:302023-05-18T09:37:58+5:30
535 कोटी रुपयांची रोकड घेऊन जाणारे वाहन विल्लुपुरमच्या दिशेने जाताना खराब झाल्याने बंद पडले होते. यासाठी पोलीस संरक्षण आवश्यक आहे.
चेन्नईमध्ये 535 कोटी रुपयांची रोकड घेऊन जाणारा ट्रक रस्त्यात खराब झाला. बुधवारी या प्रकरणाची माहिती क्रोमपेट पोलिसांना मिळताच पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना मिळालेल्या कॉलमध्ये असा दावा करण्यात आला आहे की 535 कोटी रुपयांची रोकड घेऊन जाणारे वाहन विल्लुपुरमच्या दिशेने जाताना खराब झाल्याने बंद पडले होते. यासाठी पोलीस संरक्षण आवश्यक आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच क्रोमपेट पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी एक ट्रक उभा असल्याचे पोलिसांना दिसले. यावेळी पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास करत वाहनातील घटनास्थळी उपस्थित लोकांकडून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. ट्रकच्या आसपास पोलीस पोहोचल्यावर लोकांनीही आपापले अंदाज बांधायला सुरुवात केली. रस्त्यावर लोकांची गर्दी होऊ लागली.
तांबारामचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवासन यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. दोन्ही ट्रक चेन्नईहून रिझर्व्ह बँकेची (आरबीआय) रोकड घेऊन जात असल्याचे त्यांना सांगण्यात आले. याच दरम्यान रस्त्यात ट्रकचे इंजिन बिघडले. हे समजताच आजूबाजूला लोकांची मोठी गर्दी झाली. रस्त्यावरील वाहतूक संथ गतीने सुरू होती. ट्रकमधून धूर निघू लागला, तपासणी केल्यानंतर इंजिन खराब झाल्याचे आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे.
पैसे घेऊन जाणाऱ्या दोन्ही ट्रकच्या भोवती मोठा जमाव जमलेला पाहून पोलिसांनी तातडीने दोन्ही ट्रक जवळच्या कॅम्पसमध्ये नेले. दरम्यान, ट्रकचे इंजिन दुरुस्त करण्याचे यांत्रिक काम करण्यात आले, मात्र ट्रकची दुरुस्ती होऊ शकली नाही. अखेर दुसऱ्या वाहनाच्या साहाय्याने दोन्ही ट्रक आरबीआयकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.