खचाखच भरलेली ट्रेन आणि भीषण आग; बर्निंग ट्रेनमधून 'असा' वाचला 500 प्रवाशांचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 10:36 AM2023-11-16T10:36:33+5:302023-11-16T10:37:18+5:30
रेल्वेच्या तीन बोगींची जळून राख झाली. यामध्ये 8 जण जखमी झाले आहेत. स्टेशन मास्तरच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
छट पुजेनिमित्त रेल्वे विभागाकडून विशेष गाड्या चालवल्या आहेत. यामध्ये नवी दिल्ली ते दरभंगा जाणाऱ्या प्रवाशांसाठी 02570 क्लोन एक्स्प्रेसचाही समावेश आहे. मात्र बुधवारी म्हणजेच या ट्रेनला अचानक आग लागली. त्यामुळे रेल्वेच्या तीन बोगींची जळून राख झाली. यामध्ये 8 जण जखमी झाले आहेत. स्टेशन मास्तरच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
दिल्लीहून दरभंगाच्या दिशेने जाणारी 02570 क्लोन एक्स्प्रेस ट्रेन इटावापूर्वी सराई भूपत स्थानकावरून गेली तेव्हा स्टेशन मास्टरला स्लीपर कोचमधून धूर निघताना दिसला. त्यांनी तात्काळ याची माहिती वॉकीटॉकीच्या माध्यमातून रेल्वे चालक व गार्डला दिली. स्टेशन मास्तरकडून माहिती मिळाल्यानंतर ट्रेन थांबवण्यात आली तेव्हा दोन स्लीपर कोच आणि एक जनरल डबा जळत होता. ट्रेनही प्रवाशांनी खचाखच भरली होती. आग लागल्याचे लक्षात येताच ट्रेनमध्ये चेंगराचेंगरी झाली. सर्वत्र आरडाओरडा ऐकू येत होता.
जीव वाचवण्यासाठी बोगीतून उड्या मारायला सुरुवात
ट्रेन थांबल्यावर प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी बोगीतून उड्या मारायला सुरुवात केली. ट्रेन थांबवलेल्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या. ट्रेनला लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली. जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णवाहिकेच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तीनही बोगींमध्ये ठेवलेले प्रवाशांचे सामान पूर्णपणे जळून राख झाले. मात्र सुदैवाने स्टेशन मास्तरच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना होण्यापूर्वीच टळली. तीन डब्यांमध्ये 500 प्रवासी होते
शॉर्ट सर्किटमुळे लागली आग, तपास सुरू
एसपी जीआरपी संजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्लोन एक्स्प्रेसमधील आग आटोक्यात आणल्यानंतर तिन्ही जळालेल्या बोगी बाहेर काढण्यात आल्या. त्यांच्या जागी नवीन बोगी जोडण्यात आल्या. त्यानंतर ही ट्रेन इच्छित स्थळी रवाना करण्यात आली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र, याची अद्याप पुष्टी झालेली नाही. आगीचे खरं कारण काय, याचा शोध घेतला जात आहे.
ट्रेनने छपराला जाणाऱ्या एका प्रवाशाने सांगितलं की, ट्रेनच्या आत चार्जिंग पॉईंटमध्ये कोणीतरी चार्जर लावला होता. तेथून शॉर्ट सर्किट झालं. त्यानंतर धूर निघून आग लागली. त्यामुळे रेल्वेत गोंधळ उडाला. आग लागली तेव्हा ट्रेनचा वेग जास्त होता. ट्रेन थांबवण्यासाठी कुणीतरी साखळीही ओढली. त्यानंतर काही वेळाने ट्रेन एका ठिकाणी थांबली आणि सर्व प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी उड्या मारायला सुरुवात केली. या आगीत त्याच्या दोन बॅगही जळून खाक झाल्याचं प्रवाशाने सांगितलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.