छत्तीसगढ: औषध घेण्यासाठी बाहेर पडलेल्या तरूणाच्या कानशीलात लगावणाऱ्या 'DM'ना हटवलं; मुख्यमंत्र्यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 11:47 AM2021-05-23T11:47:14+5:302021-05-23T11:51:52+5:30
Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल झाला होता व्हिडीओ. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकारी रणवीर शर्मा यांनी मागितली होती माफी.
छत्तीसगढच्या (Chhatisgarh) सरगुजा संभागच्या सूरजपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रणवीर शर्मा ( Surajpur DM Ranvir Sharma) यांना तात्काळ प्रभावानं त्यांच्या पदावरून हटवण्यात आलं आहे. छत्तीसगढमध्ये सध्या लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यादरम्यान औषध घेण्यासाठी बाहेर पडलेल्या तरूणाच्या त्यांनी कानशीलात लगावली होती. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली होती. तसंच छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ त्यांच्या पदावरून हटवण्याचे आदेश दिले.
"सोशल मीडियाच्या माध्यमातून सूरजपुरचे जिल्हाधिकारी रणबीर शर्मा यांच्याद्वारे तरूणासोबत होत असलेल्या गैरव्यवहाराचं प्रकरण माझ्या समोर आलं. हे अतिशय दु:खद आणि नींदनीय आहे. छत्तीसगढमध्ये अशाप्रकारचं कृत्य खपवून घेतलं जाणार नाही. जिल्हाधिकारी रणबीर शर्मा यांना तात्काळ प्रभावानं त्यांच्या पदावरून हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत," असं बघेल म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबद्दल माहिती दिली.
किसी भी अधिकारी का शासकीय जीवन में इस तरह का आचरण स्वीकार्य नहीं है।
— Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) May 23, 2021
इस घटना से क्षुब्ध हूँ। मैं नवयुवक व उनके परिजनों से खेद व्यक्त करता हूँ।
"कोणत्याही अधिकाऱ्याचं शासकीय जीवनात अशा प्रकारचं आचरण खपवून घेतलं नाही जाणार नाही. या घटनेनं मी स्तब्ध झालो आहे. मी त्या तरूणाबद्दल आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल खेद व्यक्त करतो," असंही त्यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.
Shocking visuals from Surajpur in Chhattisgarh collector snatched phone, slapped a boy gone out to buy medicines, polices also caned him, FIR lodged against the boy! @bhupeshbaghel@CG_Police@drramansingh@ndtv@ndtvindia@manishndtv@rohini_sgh@ajaiksaran@sunilcrediblepic.twitter.com/T3c4Y6zW7s
— Anurag Dwary (@Anurag_Dwary) May 22, 2021
काय आहे प्रकरण?
शनिवारी दुपारी लॉकडाऊनदरम्यान एक तरूण औषधाची चिठ्ठी घेऊन औषध घेण्यासाठी बाहेर पडला होता. त्याचवेळी जिल्हाधिकारी रणबीर शर्मा लॉकडाऊनची पाहणी करण्यासाठी बाहेर आले होते. यादरम्यान, रस्त्यावरील लोकांची ये-जा पाहून त्यांना संताप आला. त्याचवेळी तो तरूण त्यांच्यासमोर आल. आपल्या सोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांसह जिल्हाधिकाऱ्यांनी त्या तरूणाला रोखलं. त्यानंतर त्यांनी त्या तरूणाच्या कानशीलात लगावली. यादरम्यान त्या तरूणानं औषधाची चिठ्ठीही जिल्हाधिकाऱ्यांना दाखवली परंतु त्यांनी त्याचं ऐकलं नाही. इतकंच नाही तर त्यांनी त्या तरूणाचा मोबाईलही घेऊन रस्त्यावर आपटल्याचं व्हायरल (Collector Video Viral) झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी माफीही मागितली होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी या घटनेची दखल घेत त्यांना पदावरून हटवलं आहे.