आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होतेय, यापेक्षा वेगळा आनंद नाही - एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 10:09 PM2023-02-19T22:09:41+5:302023-02-19T22:11:42+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानेच आम्हाला धनुष्यबाण मिळाला आहे. ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे ते म्हणाले.
“आज मोठा दिवस आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आग्र्यात साजरी होत आहे. ज्या ठिकाणी महाराजांनी औरंगजेबाला सडेतोड उत्तर दिलं होतं त्या ठिकाणी जयंती साजरी होते त्यापेक्षा आनंदाचा आणि महत्त्वाचा आणखी कोणता दिवस असू शकतो. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या दृष्टीनं आजचा दिवस ऐतिहासिक आहे,” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती सोहळा आज आग्र्यात साजरा करण्यात आला. त्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे उपस्थित होते.
“महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज आग्र्यात साजरी होतेय यापेक्षा वेगळा आनंद असू शकत नाही. आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जावा असा दिवस आहे,” असं एकनाथ शिंदे म्हणाले. या ऐतिहासिक क्षणाचे श्रेय महाराष्ट्रातल्या शिवप्रेमी आणि शिवभक्तांना जात असल्याचे ते एका प्रश्नाचं उत्तर देताना म्हणाले.
“आज सकाळी आम्ही शिवनेरीला होतो. तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा झाला. त्याच दिवाण-ए-आम मध्ये औरगजेबाला सडेतोड उत्तर दिलं. आग्र्याहून सुरक्षित सुटकाही इथूनच झाली, त्यामुळे या ठिकाणी आम्हाला शिवजयंती साजरी करायला मिळतेय, त्यामुळे मी सर्वांचं अभिनंदन करतो,” असं एकनाथ शिंदे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानेच आम्हाला धनुष्यबाण मिळाला आहे. ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सत्याचा विजय होतोच. मोठा निर्णय मिळाला आहे एवढंच सांगू इच्छित असल्याचे ते म्हणाले.