छत्रपती शिवरायांच्या काश्मीरमधील पुतळ्याचा अनावरणाचा सोहळा ‘टॉप ट्रेडिंग’

By राजेश भोजेकर | Published: November 8, 2023 12:57 PM2023-11-08T12:57:30+5:302023-11-08T13:00:39+5:30

नेटकऱ्यांकडून सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

Chhatrapati Shivaji Statue Unveiling Ceremony in Kashmir 'Top Trading' | छत्रपती शिवरायांच्या काश्मीरमधील पुतळ्याचा अनावरणाचा सोहळा ‘टॉप ट्रेडिंग’

छत्रपती शिवरायांच्या काश्मीरमधील पुतळ्याचा अनावरणाचा सोहळा ‘टॉप ट्रेडिंग’

राजेश भोजेकर, कुपवाडा (जम्मू काश्मीर)/ चंद्रपूर : जम्मू काश्मीर मधील कुपवाडा जिल्ह्यात भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी (ता. ७) छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण झाले. महाराष्ट्रासह संपूर्ण देशाची मान अभिमानाने ऊंचावणारा हा प्रसंग तसा ऐतिहासिकच ठरला. थेट प्रक्षेपणामुळे सातासमुद्रापार असलेल्या भारतीयांनाही त्याचे साक्षीदार होता आले. आणि त्यामुळे थेट ट्विटरवर (एक्स) #ChhatrapatiAtIndoPakBorder या हॅशटॅगने अक्षरशः आघाडी घेतली. बघता बघता महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा ‘टॉप ट्रेंडिंग’ ठरला. या दुहेरी आनंदाचीच काल सर्वत्र चर्चा होती. 

आम्ही पुणेकर संस्था आणि ४१ राष्ट्रीय रायफल मराठा बटालियन यांच्या माध्यमातून जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानं पार पडलेला हा कार्यक्रम मंगळवारी दिवसभर सोशल माध्यमांवर ‘टॉप ट्रेंडिंग’ होता. या कार्यक्रमाला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आम्ही पुणेकर संस्थेचे विश्वस्त अभयसिंह शिरोळे, हेमंत जाधव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. जम्मू काश्मीरातील या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या असंख्य नेटकऱ्यांनी ट्विटरवर (एक्स) #ChhatrapatiAtIndoPakBorder हा ‘हॅशटॅग’ पूर्णवेळ ‘ट्रेंडिंग’ ठेवला. दिवाळी अगदी चार दिवसांवर आलेली असल्यामुळे नियंत्रण रेषेजवळ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भारतीय सैनिकांना दिवाळीच्या फराळाचं सुद्धा वितरण केलं. ना. मुनगंटीवार यांनी भारतीय सैन्य दलातील अधिकारी व सैनिकांना मिठाई भरवत त्यांचे तोंड गोड केले व खऱ्या अर्थाने गौरवाचा क्षण साजरा केला.  

पुतळा प्रेरणादायी ठरेल : मुख्यमंत्री

भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना प्रेरणादायी, उर्जादायी ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. अश्वारुढ पुतळ्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पाकिस्तानच्या दिशेने बघत आहेत. त्यांच्या हातात तलवार आहे. महाराज येथे असल्याने शत्रू येथे पाऊल ठेवण्यास धजावणार नाही. पुतळा पाहिल्यावर दहशतवादी सुद्धा काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याची हिंमत करणार नाहीत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. ज्याठिकाणी हा पुतळा बसवला आहे त्या ठिकाणी काही दिवसांपूर्वी मोठा खड्डा पडला होता. तेव्हा जवानांनी सुमारे १ हजार ८०० ट्रक माती भरून पुतळ्यासाठी भक्कम पाया तयार केला, हे विशेष. 

ना. मुनगंटीवार यांच्या कार्याचे कौतुक

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण झाली. सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत यानिमित्ताने अनेक उपक्रम राबविले. लवकरच त्यांच्या पुढाकारानं छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखंही महाराष्ट्रात येत असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. 

शिवाजी महाराजांचे विचार दिशादर्शक : ना. सुधीर मुनगंटीवार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावातच शक्ती आणि ऊर्जा आहे, असे स्फूर्तीदायक प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केले. दैनंदिन जीवनातील प्रत्येक समस्येवर मार्ग दाखविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार दिशादर्शक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं भारतात येणार आहेत. ही वाघनखं भारतात आणण्यासाठी लंडनमध्ये सामंजस्य करार करण्यात आलाय. राज्यासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे ना. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

Web Title: Chhatrapati Shivaji Statue Unveiling Ceremony in Kashmir 'Top Trading'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.