वाघनखांपाठोपाठ छत्रपती शिवरायांची तलवारही येणार? ऋषी सुनक यांच्यावर दबाव, केंद्रासह महाराष्ट्र शासनाकडून प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 07:18 AM2023-10-13T07:18:20+5:302023-10-13T07:28:53+5:30
अशोक टंडन यांच्या आगामी पुस्तकात तपशील...
हरीश गुप्ता -
नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक जगदंबा तलवार ब्रिटनमधून भारतात परत आणण्याच्या मोहिमेला मागील काही दिवसांपासून वेग आला आहे. सुरुवातीला भास्कर घोरपडे यांनी सुरू केलेल्या या मोहिमेत आता महाराष्ट्र सरकारही सहभागी झाले आहे. अलीकडेच महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ मंत्री लंडनमध्ये
जाऊन आले. त्यामुळे या तलवारीसाठी ऋषी सुनक यांच्यावर दबाव
वाढल्याचे म्हटले जात आहे.
ही तलवार भारतात आणण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचा सविस्तर तपशील दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे माजी माध्यम सल्लागार अशोक टंडन यांनी दिला आहे. त्यांच्या ‘द रिव्हर्स स्विंग’ या पुस्तकाचे १८ ऑक्टोबर रोजी केंद्रीय पेट्रोलियम व गृहनिर्माण आणि नागरी व्यवहारमंत्री हरिदीप सिंह पुरी यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.
देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीक
सर्वप्रथम राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्याकडे ३५० वर्षे जुनी तलवार परत मिळावी, यासाठी याचिका पाठवण्यात आली होती. ही तलवार म्हणजे देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे आणि देशातील लोकांसाठी, विशेषत: महाराष्ट्रातील लोकांसाठी त्याला मोठे भावनिक मूल्य आहे, असे त्यात म्हटले होते.
त्यावर ब्रिटिश सरकारने सांगितले होते की, ही तलवार १८५७ मध्ये कोल्हापूरच्या तत्कालीन महाराजांनी प्रिन्स ऑफ वेल्स, एडवर्डस सातवे यांना भारत दौऱ्यात भेट दिली होती. ती अत्यंत सुरक्षितपणे जतन करण्यात येत असून, भारतातून येणाऱ्या लाखो लोकांना ती पाहण्यास उपलब्ध आहे.
२०२४ पूर्वी तलवार आणावी
- तलवार परत आणण्याच्या मोहिमेत महाराष्ट्र सरकार सहभागी झाले असून, मोदी सरकारने हा विषय ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याकडे उपस्थित करावा.
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल २०२४ पर्यंत ही तलवार परत आणावी, अशी विनंती केली आहे.
- सध्या ही तलवार लंडनमध्ये सेंट जेम्स पॅलेसमधील रॉयल कलेक्शन ट्रस्टचा भाग आहे.