महाराष्ट्रानंतर छत्तीसगडमध्ये मोठी कारवाई, 7 नक्षलवाद्यांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 12:23 PM2018-04-27T12:23:23+5:302018-04-27T12:48:49+5:30
सात नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश मिळालेलं आहे.
छत्तीसगड - महाराष्ट्रानंतर आता छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी कारवाईमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे. छत्तीसगडमधील बिजापूर येथे सुरक्षा दलानं 7 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. जिल्ह्यामध्ये शोधमोहीम सुरू असताना सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये 7 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आलेले आहे. छत्तीसगड-तेलंगणाच्या सीमेवर ही चकमक घडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, नक्षलवाद्यांसोबत झालेल्या या चकमकीमध्ये तीन जवानदेखील जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
Chhattisgarh: 7 naxals killed in an encounter with security forces in Bijapur district. More details awaited.
— ANI (@ANI) April 27, 2018
(गडचिरोलीत पोलिसांनी दोन दिवसांत ३७ नक्षल्यांना संपविले)
दरम्यान, गेल्या आठवड्यात गडचिरोली येथे नक्षलविरोधी अभियानादरम्यान पोलिसांनी अभूतपूर्व यश मिळवत 16 नक्षल्यांना कंठस्नान घातल्याचे दिसून आले तरी प्रत्यक्षात त्या चकमकीतील मृतांचा आकडा आता 31 वर पोहोचला आहे. मंगळवारी राबविलेल्या शोधमोहीमेत छत्तीसगड सीमेवरील इंद्रावती नदीत 15 मृतदेह पोलिसांना आढळून आले. यासोबतच सोमवारी अहेरी तालुक्यातील नैनर परिसरात झालेल्या चकमकीत सहा नक्षली ठार झाले. त्यामुळे सलग दोन दिवसांत झालेल्या चकमकींमध्ये प्रथमच तब्बल 37 नक्षलवादी मारले गेले. नक्षलविरोधी अभियानात आतापर्यंत पोलिसांना मिळालेले हे सर्वात मोठे यश ठरले आहे.
छत्तीसगड सीमेजवळील ताडगावजवळच्या कसनासूर जंगलात रविवारी (22 एप्रिल) सकाळी पोलीस आणि नक्षलवाद्यांमधे चकमक उडाली होती. 35 ते 40 च्या संख्येत असलेल्या नक्षलवाद्यांवर पोलीस भारी पडले आणि 16 जण त्याच परिसरात ठार झाले तर बाकी पळून गेले. पण त्यातील बरेच जण जखमी झाले होते. जंगलात पळून गेल्यास पोलीस शोधून काढतील म्हणून त्यांनी इंद्रावती नदी पार करत छत्तीसगडच्या सीमेत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र जखमी अवस्थेत नदी पार करणे अनेकांना शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांना पाण्यातच प्राण सोडावे लागले.
सोमवारी संध्याकाळी इंद्रावती नदीत काही मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, पण रात्री अंधारात शोध घेणे कठीण झाल्याने मंगळवारी पहाटेपासून स्थानिक नावाड्यांच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. त्यात दुपारपर्यंत 15 मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यामुळे रविवारच्या चकमकीतील मृतांचा एकूण आकडा 31 झाला असून त्यामध्ये 15 महिला व 16 पुरूष नक्षलवाद्यांचा समावेश आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या मदतीने सी-60 पथकाचे जवान शोधमोहीम राबवत आहेत. सायंकाळपर्यंत मृतदेहांचा आणि त्यांच्याकडील शस्त्रांचा इंद्रावती नदी आणि परिसरात शोध घेत होते.
सोमवारच्या चकमकीत सहा नक्षली ठार
अहेरी तालुक्यातील राजाराम खांदलाजवळील नैनेर जंगलात नक्षलवादी व सी-60 पोलीस जवान यांच्यामध्ये सोमवारी सायंकाळी 4.30 ते 5 वाजताच्या दरम्यान चकमक उडाली. सदर चकमक अर्धा तास चालली. या चकमकीत एकूण सहा नक्षलवादी ठार झाले. यामध्ये चार महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचा समावेश आहे. या चकमकीत डीव्हीसी रँकचा नक्षल कमांडर नंदू ऊर्फ वासुदेव आत्राम हा सुद्धा ठार झाला आहे. मृतांपैकी कार्तिक उईके याची ओळख पटली आहे. घटनास्थळावरून 1 एसएलआर, 1 इन्सास, 1 थ्रीनॉटथ्री रायफल, 1 मस्केट रायफल, 2 बारा बोअर रायफल, पिट्टू व नक्षल साहित्य जप्त करण्यात आले.