Chhattisgarh Assembly Election 2018: मत द्या, नाहीतर तुमची खैर नाही; भाजपा उमेदवाराची मतदारांना धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 03:17 PM2018-11-01T15:17:11+5:302018-11-01T15:18:09+5:30
ओम प्रकाश चौधरी यांची तशी जनतेत चांगली प्रतिमा असतानाही त्यांनी मतदारांनाच धमकी दिली आहे.
रायपूर- छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपानं आयएएस ओम प्रकाश चौधरी यांना खरसिया मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. ओम प्रकाश चौधरी यांची तशी जनतेत चांगली प्रतिमा असतानाही त्यांनी मतदारांनाच धमकी दिली आहे. जे लोक चांगल्या कामात मला साथ देणार नाहीत, त्यांची खैर नाही, असं ओ. पी. चौधरी म्हणाले आहेत.
ओपी चौधरींचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात ते मतदारांना धमकावताना पाहायला मिळत आहेत. मोदीजी 2019मध्ये प्रचंड बहुमताचं केंद्रात सरकार बनवणार आहेत. तर 2018मध्ये चौथ्यांदा छत्तीसगडमध्ये रमण सिंह यांचं सरकार येणार आहे. मी भाजपाचा भाग असल्यानं खूप ताकदवान असेन, जे लोक चांगल्या कामात माझी साथ देणार नाहीत, त्यांनाही मी साथ देणार नाही. जे माझ्याबरोबर नसतील, त्यांची खैर नाही, असंही ते म्हणाले आहेत.
विशेष म्हणजे ऑगस्ट महिन्यात स्वतःच्या पदाचा राजीनामा देऊन ते भाजपात सक्रिय झाले आहेत. ते दुसरे तिसरे कोणी नसून रायपूरचे माजी कलेक्टर ओ. पी. चौधरी आहेत. ओ. पी. चौधरी हे 2005च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. खरसियाचे विद्यमान आमदार उमेश पटेल ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात, ओ. पी. चौधरीही त्याच अघरिया समाजाचे आहेत. या मतदारसंघातून 1990मध्ये काँग्रेसकडून नंदकुमार पटेल यांनी निवडणूक लढवली होती आणि 2013पर्यंत ते इथले आमदार होते. पाच वेळा विधानसभेवर निवडून येत त्यांनी 22 वर्षं खरसिया मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. त्यांनी मध्य प्रदेश, छत्तीसगड एकत्र राज्य असताना काँग्रेस सरकारमध्ये मंत्रिपद भूषवलं होतं.
2013मध्ये बस्तरमधल्या झीरम घाटीमध्ये नक्षलींनी त्यांची हत्या केली. त्यानंतर त्यांचे पुत्र उमेश पटेल यांना 2013मध्ये काँग्रेसनं निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आणि निवडून आणलं. खरसिया या मतदारसंघात आदिवासींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जवळपास 40 टक्के लोकसंख्या आदिवासींची आहे. तसेच अघरिया समाज, शाहू समाजाचंही प्राबल्य आहे.