डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आज मी पंतप्रधान झालो - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2018 06:41 PM2018-04-14T18:41:11+5:302018-04-14T18:49:13+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमधील बिजापूर येथे आयुष्यमान भारत योजनेच्या शुभारंभावेळी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत.

Chhattisgarh Baba saheb ambedkar contribution to becoming the prime minister of backwardness like me says narendra modi | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आज मी पंतप्रधान झालो - नरेंद्र मोदी

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आज मी पंतप्रधान झालो - नरेंद्र मोदी

Next

बिजापूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमधील बिजापूर येथे आयुष्यमान भारत योजनेच्या शुभारंभावेळी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झालेली असताना बिजापूरच्या मागासलेपणाला पूर्वीच्या सत्ताधा-यांना जबाबदार धरत त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे तर दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे कौतुक करत दलित समुदायाची नाराजीदेखील दूर करण्याचा प्रयत्न केला. 

''एक गरीब आईचा मुलगा आणि अति मागास समाजातून आलेली एखादी व्यक्ती जर आज पंतप्रधान होऊ शकते तरी ती केवळ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच '', असे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.  '14 एप्रिल हा दिवस देशातील सव्वाशे कोटी जनतेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. या निमित्ताने जनतेचा आशीर्वाद घेण्याचे भाग्य लाभले', असेही ते म्हणालेत.

अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये सुप्रीम कोर्टाने केलेल्या बदलानंतर केंद्रातील भाजपा सरकारविरोधात दलितांमध्ये नाराजी आहे. सुप्रीम कोर्ट आणि केंद्र सरकारविरोधात दलित संघटनांनी 2 एप्रिलला भारत बंद पुकारला होता. या बंदला अनेक ठिकाणी हिंसक वळण प्राप्त झाले होते. यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 127व्या जयंती निमित्त ''आयुष्यमान भारत योजने''चे उद्घाटन करत मोदींनी दलितांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.

आयुष्यमान भारत योजनेचा शुभारंभ

दरम्यान, आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पहिल्या आरोग्यसेवा केंद्राचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (14 एप्रिल) केले. या योजनेंतर्गत पहिले आरोग्य केंद्र मिळवण्याचा मान छत्तीसगडला मिळाला असून या राज्यातील बिजापूर येथे या केंद्राच्या कामाला सुरुवात झाली आहे. आयुष्यमान भारत योजना ही केवळ आरोग्यसेवा देण्यापुरती सीमित नाही तर आरोग्यपूर्ण, ताकदवान असा नव्या भारताच्या निर्मितीसाठी लोकांना समाविष्ट करुन घेण्यासाठी आहे,असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेच्या शुभारंभानंतर केले. आयुष्यमान भारत ही योजना राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना म्हणूनही ओळखली जाते. या योजनेची दोन प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. सर्व स्तरातील प्राथमिक आरोग्यसेवा मिळण्यासाठी प्रयत्न करणे आणि देशाच्या 40 टक्के लोकसंख्येला विम्याचे संरक्षण देणे ही या योजनेची मुख्य उद्दिष्ट्ये आहेत. आजवर आरोग्यसेवांपासून दुर्लक्षित राहिलेल्या लोकांना या योजनेचा लाभ मिळावा असा त्यामागे उद्देश आहे.

ही योजना 10 लाख गरिब कुटुंबांना 5 लाखांपर्यंत दुय्यम आणि तृतीय रुग्णालय सेवांसाठी संरक्षण उपलब्ध करुन देणार आहे. केंद्र सरकारच्या कॅबिनेटकडून 10,500 कोटी रुपयांच्या या योजनेला 21 मार्च रोजी मान्यता मिळाली होती. आदिवासी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिजापूर जिल्ह्यात जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. या जिल्ह्यात निर्माण गुडुम ते भानूप्रतापूर या नव्या रेल्वेमार्गाचा शुभारंभही त्यांच्या हस्ते करण्यात आला. या वर्षाच्या अखेरीस छत्तीसगडमध्ये निवडणुका होणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या भेटीला विशेष महत्त्व आहे. छत्तीसगडला त्यांनी पंतप्रधान झाल्यानंतर दिलेली ही चौथी भेट आहे. रस्ते आणि पुल बांधण्याच्या विविध 1700 कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. तसेच बस्तरमध्ये इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी 40 हजार किमीचे फायबर ऑप्टीक्स केबलचे जाळे पसरवण्यात येणार आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटनही त्यांनी केले.
 




 



 

Web Title: Chhattisgarh Baba saheb ambedkar contribution to becoming the prime minister of backwardness like me says narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.