जिन्स, टी-शर्ट परिधान करून सरकारी कर्मचाऱ्यांनी ऑफिसला येऊ नये- प्रशासन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 09:52 AM2019-06-12T09:52:23+5:302019-06-12T09:52:31+5:30
सरकारी कर्मचाऱ्यांनी जिन्स, टी-शर्ट परिधान करून ऑफिसला येऊ नये, असे फर्मान प्रशासनानं काढलं आहे.
बीजापूरः सरकारी कर्मचाऱ्यांनी जिन्स, टी-शर्ट परिधान करून ऑफिसला येऊ नये, असे फर्मान प्रशासनानं काढलं आहे. छत्तीसगडच्या बीजापूर जिल्हाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना वाट्टेल तसे कपडे परिधान करून ऑफिसात येण्यास मज्जाव केला आहे. सरकारी कर्मचारी टी-शर्ट, जिन्स आणि आकर्षक कपडे परिधान करून कार्यालयात येऊ शकत नाही, असा आदेशच जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी कार्यालयात स्वतःच्या सभ्यतेला शोभून दिसतील असे कपडे घालावेत.
बीजापूरचे जिल्हाधिकारी केडी कुंजम यांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा कडक नियम लागू केला आहे. आदेशात म्हटलं आहे की, नियमानुसार सरकारी कर्मचाऱ्यांनी असे कपडे परिधान केले पाहिजेत, जेणेकरून त्यांची सभ्यता दिसेल. जर या आदेशाचं कोणीही पालन केलं नाही, तर त्या संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करण्याचे सूतोवाच जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहेत. त्याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनाही इशारा दिला आहे. तुम्ही गणवेशातच कार्यालयात उपस्थित राहिलं पाहिजे. कर्मचाऱ्यांना एवढा भत्ता मिळत असूनही योग्य कपडे परिधान करून ते कार्यालयात येत नाहीत. त्यासाठी ही सक्ती केली जात असल्याचा खुलासाही जिल्हाधिकाऱ्यांनी केला आहे.