अरुण साव-विजय शर्मा उपमुख्यमंत्री, रमण सिंह विधानसभेचे अध्यक्ष? छत्तीसगडमध्ये चित्र स्पष्ट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2023 19:20 IST2023-12-10T19:18:24+5:302023-12-10T19:20:54+5:30
Chhattisgarh News: छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री विष्णूदेव साय यांच्या सरकारचे चित्र हळूहळू स्पष्ट होत असल्याचे सांगितले जात आहे.

अरुण साव-विजय शर्मा उपमुख्यमंत्री, रमण सिंह विधानसभेचे अध्यक्ष? छत्तीसगडमध्ये चित्र स्पष्ट!
Chhattisgarh News: मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये बाजी मारल्यानंतर या तीनही राज्यात मुख्यमंत्री कोण असेल, याबाबत भाजपचे ठरत नव्हते. अखेर छत्तीसगडमधील तिढा सुटल्याची माहिती देण्यात येत आहे. मुख्यमंत्रीपदी विष्णूदेव साय यांची वर्णी लागल्यानंतर आता छत्तीसगडमध्ये दोन नेत्यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रीपदाची माळ घालण्यात येणार आहे.
आदिवासी समुदायातून येणारे विष्णूदेव साय हे आता छत्तीसगडच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळताना दिसतील. तसेच तेच विधिमंडळ नेतेही असतील. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आदिवासी समाजाला योग्य सन्मान दिला जाईल, असे भाजपने यापूर्वीच म्हटले होते. आता मुख्यमंत्री पदासाठी विष्णुदेव साय यांच्या नावाची घोषणा करून भाजपने याची सुरुवात केली असल्याचे बोलले जात आहे. यानंतर आता छत्तीसगडला दोन उपमुख्यमंत्री देण्यात आले आहेत.
अरुण साव-विजय शर्मा उपमुख्यमंत्री?
छत्तीसगडमध्ये दोन उपमुख्यमंत्री असतील. अरुण साव आणि विजय शर्मा हे दोन छत्तीसगडचे नवे उपमुख्यमंत्री असू शकतील, असे सांगितले जात आहे. तसेच माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांना विधानसभा अध्यक्ष करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दुसरीकडे, नवे मुख्यमंत्री विष्णूदेव साय यांनी राज्यपाल विश्वभूषण हरिश्चंद्र यांची भेट घेतली आणि सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. लवकरच शपथविधी सोहळा आणि मंत्रिमंडळातील अन्य मंत्र्यांची नावे निश्चित केली जातील, असे सांगितले जात आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री या नात्याने माझ्या सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी दिलेली हमी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. गृहनिर्माण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी १८ लाख घरे मंजूर करणे हे नवीन छत्तीसगड सरकारचे पहिले काम असेल, अशी पहिली प्रतिक्रिया विष्णूदेव साय यांनी माध्यमांशी बोलताना दिली.