छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे पाच उमेदवार जाहीर, भाजपचे उमेदवार ठरेनात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 05:51 PM2019-03-18T17:51:00+5:302019-03-18T17:52:04+5:30
छत्तीसगडमध्ये शेतकरी, आदिवासींचे मतदान ठरणार निर्णायक काँगे्रसचे पाच उमेदवार जाहीर : भाजपचे उमेदवार ठरेनात
साहेबराव नरसाळे
छत्तीसगडमध्ये विधानसभेप्रमाणेच लोकसभेच्या निवडणुकीतही शेतकरी, आदिवासींचे मतदान निर्णायक ठरणार आहे़ त्यादृष्टीने नव्या चेहऱ्यांना रिंगणात उतरविण्याचा भाजपमध्ये खल सुरु आहे तर काँगे्रसने पाच आदिवासी उमेदवारांची घोषणा केली आहे. छत्तीसगडमधील ११ जागांसाठी चार जागा अनुसुचित जाती जमातीसाठी तर १ जागा अनुसुचित जातीसाठी राखीव आहे, उर्वरित ६ जागा खुल्या प्रवर्गासाठी आहेत. यातील चार अनुसुचित जाती जमाती व एका अनुसुचित जमातीच्या जागेवर काँग्रेसने उमेदवार जाहीर केले आहेत. विधानसभा निवडणुकीत आदिवासी समाज काँग्रेसच्या पाठिशी उभा राहिला. काँग्रेसकडून इच्छूकांची मोठी संख्या होती.
काँग्रेसचे प्रभारी पी़ एल. पुनिया यांच्या बैठकीत तब्बल १७६ नावांवर चर्चा केली होती़ त्यातून आदिवासी मतदारसंख्या अधिक असलेल्या पाच मतदारसंघातील उमेदवार काँगे्रसने जाहीर केले आहेत. उर्वरित पाच खुला प्रवर्गातील मतदारसंघातील उमेदवारांची नावेही अंतिम करण्यात आली आहेत़ त्याची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. भाजपचे प्रभारी अनिल जैन, आदिवासी नेते व नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष विक्रम उसेंडी यांनी भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या असून, कार्यकर्त्यांची मतेही जाणून घेतली आहेत. त्यानुसार भाजपच्या दहा खासदारांपैकी सहा जागांवर नव्या चेहऱ्यांना पसंती दिली जाणार असल्याचे त्यांनी संकेत दिले आहेत. काँग्रेसचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर भाजपचे उमेदवार जाहीर होतील, असे जैन यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
प्रेमनगरचे आमदार तथा सरगुजा आदिवासी विकास प्राधिकरणचे अध्यक्ष खेलसाय सिंह यांना सरगुजा मतदारसंघातून काँगे्रसकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. खेलसाय सिंह हे सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. रायगडमधून लालजीत सिंह राठिया यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. आदिवासींना त्यांच्या जमिनी परत मिळवून देण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावणारे चित्रकोटचे आमदार दीपक बैज यांना बस्तरमधून लोकसभेच्या मैदानात उतरविण्यात आले आहे. जांजगिर चाम्पामधून रवी भारद्वाज यांना उमेदवारी मिळाली असून, ते काँगे्रसचे वरिष्ठ नेते स्वर्गीय परसराम यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी २००३ साली विधानसभा निरवडणुक लढविली होती़ परंतु त्यांना अपयश आले होते़ कोररचे जिल्हा परिषद सदस्य विरेश ठाकूर यांना कांकेरमधून लोकसभेच्या आखाड्यात उतरविण्यात आले आहे़
सोमवारपासून अर्ज भरण्यास प्रारंभ
११ एप्रिल रोजी बस्तर, १८ एप्रिल रोजी कांकेर, राजनांदगाव, महासमुंद, २३ एप्रिल रोजी रायपूर, दूर्ग, बिलासपूर, जांजगिर चांपा, कोरबा, रायगड, सरगुजा मतदारसंघात मतदान होणार आहे़ या निवडणुकीत छत्तीसगडमध्ये तब्बल १३ लाख तरुण मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत़ सोमवारी (दि़१८) बस्तर लोकसभेतील उमेदवारांचे अर्ज भरण्यास प्रारंभ होत आहे़ तर कांकेर, राजनांदगाव, महासमुंद मतदारसंघासाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे़
जनता काँग्रेस फुटली
काँग्रेसमधून २०१६ मध्ये बाहेर पडून जनता काँग्रेस पक्ष काढणाऱ्या अजित जोगी यांची पाच निष्ठवंतांनी साथ सोडली असून, ते पाचही नेते काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत़ विशेष म्हणजे या पाचही नेत्यांनी जनता काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.