मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 09:40 AM2024-05-05T09:40:10+5:302024-05-05T09:40:55+5:30
Chhattisgarh Crime News: बहीण-भावाच्या नात्याला कलंकित करणारी एक घटना छत्तीसगडमधून समोर आली आहे. येथील खैरागड-हुईखदान-गंडई (केसीजी) येथे एका १४ वर्षांच्या मुलीने तिच्या मोठ्या भावाची हत्या केली.
बहीण-भावाच्या नात्याला कलंकित करणारी एक घटना छत्तीसगडमधून समोर आली आहे. येथील खैरागड-हुईखदान-गंडई (केसीजी) येथे एका १४ वर्षांच्या मुलीने तिच्या मोठ्या भावाची हत्या केली. मोबाईलवरून सतत मुलांशी बोलत असते म्हणून हा भाऊ आरोपी मुलीला ओरडला होता. त्यामुळे रागाच्या भरात तिने त्याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून त्याची हत्या केली.
पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, छुईखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमलीडीहकला गावात ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणातील आरोपी मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी मुलीने पोलिसांना सांगितले की, ही घटना घडली तेव्हा ती आणि तिचा भाऊ असे दोघेच घरामध्ये होते. तर कुटुंबातील इतर व्यक्ती कामधंद्यासाठी घराबाहेर गेल्या होत्या. या दरम्यान, या मुलीचा भाऊ ती मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून तिला ओरडला. तसेच यापुढे फोन वापरू नकोस, असे त्याने तिला सांगितले.
भाऊ रागावल्याने संतापलेल्या मुलीने तो झोपला असताना कुऱ्हाडीने त्याच्यावर हल्ला केला. तसेच त्याच्या गळ्यावर वार केले. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर ती आंघोळीस गेली. तिथे त्याने कपड्यावर लागलेले रक्ताचे डाग स्वच्छ केले. नंतर तिने भावाची हत्या झाल्याचे शेजाऱ्यांना सांगितले.
त्यानंतर तिथे आलेल्या आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना खबर दिली. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा या मुलीने गुन्हा कबूल केला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला. तसेच आरोपी मुलीला ताब्यात घेतले.