रुग्ण तडफडत होता अन् रुग्णालयाचा स्टाफ पार्टीत व्यस्त; उपचार करण्यास नकार...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 05:55 PM2024-07-16T17:55:11+5:302024-07-16T17:55:41+5:30
वरिष्ठांनीही कारवाई करण्यास टाळाटाळ केली.
छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील जिल्हा रुग्णालयात रुग्णाचा तडफडत होता, मात्र ओपीडीची वेळ संपली म्हणून कर्मचाऱ्यांनी रुग्णावर उपचार करण्यास नकार दिला. विशेष म्हणजे, सर्व कर्मचारी आत वाढदिवसाची पार्टी करत होते. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ रुग्णाच्या कुटुंबीयांनी बनवला असून, यातून रुग्णालय व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा दिसून येतो.
व्हिडिओमध्ये एक महिला कर्मचारी ओपीडीमध्ये बसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. तिच्या समोर एक रुग्ण स्ट्रेचरवर तडफडत आहे, पण ती ओपीडीची वेळ संपल्याचे सांगत उपचार करण्यास नकार देते. कुटुंबीयांनी त्या महिला कर्मचाऱ्याला विनंती करुनही तिने ऐकले नाही. रुग्णाच्या कुटुंबीयांनी बनवलेल्या व्हिडिओमध्ये आपली ड्युटी संपल्याचे सांगून उपचार न करणारे कर्मचारी आपल्या एका सहकाऱ्याचा वाढदिवस साजरा करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यांना केक कापायला वेळ आहे, पण रुग्णावर उपचार करण्यास वेळ नाही.
डॉक्टरांनीही जखमींवर उपचार केले नाहीत
दरम्यान, दोन जखमींना घेऊन 108 रुग्णवाहिका तेथे पोहोचली. एकाचे डोके फुटले होते, तर दुसऱ्याच्या शरीरावर गंभीर जखमा होत्या. रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर त्वरीत उपचार करण्यास सांगितले, मात्र वाढदिवसाच्या पार्टीत व्यस्त असलेल्या डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्याने उपचार केले नाहीत. त्यांची वाढदिवसाची पार्टी पार पडल्यावर बऱ्याच वेळेनंतर जखमींवर उपचार करण्यात आले.
रुग्णाच्या कुटुंबीयांना या घटनेची संपूर्ण माहिती सिव्हिल सर्जन डॉ. हेमंतकुमार साहू यांना द्यायची असता त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत असल्याचे सांगून आरएमओकडे तक्रार करण्यास सांगितले. या प्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.