भीषण अपघात! मिरवणुकीत घुसलेल्या कारनं अनेकांना उडवलं; ४ जणांचा मृत्यू, २० जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 06:16 PM2021-10-15T18:16:08+5:302021-10-15T18:19:07+5:30
काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; भरधाव कारनं अनेकांना चिरडलं
जशपूर: छत्तीसगडच्या जशपूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. रस्त्यावरून जात असलेल्या एका धार्मिक मिरवणुकीत कार घुसल्यानं ४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर वीसहून अधिक जण जखमी झाले आहेत. कार अचानक मिरवणुकीत घुसल्यानं हा भीषण अपघात घडला. या अपघातानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली. उपस्थित लोक संतापल्यानं परिसरात तणाव निर्माण झाला. उपस्थितांनी लोकांना चिरडणारी कार पेटवून दिली. या प्रकरणी पोलिसांनी कार चालकासह दोघांना अटक केली.
बबलू विश्वकर्मा असं मुख्य आरोपीचं नाव आहे. त्याचं वय २१ वर्षे आहे. तो मध्य प्रदेशातल्या सिंगरौलीचा रहिवासी आहे. तर दुसऱ्या आरोपीचं नाव शिलुपाल साहू असं आहे. त्याचं वय २६ वर्षे आहे. तो मध्य प्रदेशातल्या बबरगवा जिल्ह्याचा रहिवासी आहे. दोन्ही आरोपींविरोधात कारवाई करण्यात येत आहे.
छत्तीसगड: मिरवणुकीत घुसलेल्या भरधाव कारनं अनेकांना उडवलं; भीषण अपघात कॅमेऱ्यात कैद https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/J3rXvDkhKb
— Lokmat (@MiLOKMAT) October 15, 2021
घटनेमुळे संतापलेल्या लोकांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. संतप्त लोकांना शांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नेमका कसा घडला अपघात?
छत्तीसगडच्या जशपूरमध्ये दुर्गा मातेच्या विसर्जनासाठी मिरवणूक निघाली होती. त्यात १०० ते १५० जणांचा सहभाग होता. तितक्यात मागून एक कार भरधाव वेगानं आली. तिनं मिरवणुकीतील अनेकांना धडक दिली. लोकांना चिरडत कार पुढे निघून गेली. या कारमध्ये गांजा होता अशी प्राथमिक माहिती पुढे आली आहे.