छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातील २० जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण; ७०.८७ टक्के झाले मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 06:12 PM2023-11-07T18:12:30+5:302023-11-07T18:19:19+5:30
Chhattisgarh Election: छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात २० जागांवर मतदान झाले.
छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान संपले आहे. मतदान केंद्र परिसरात उपस्थित असलेले लोक अजूनही मतदान करू शकतील. पहिल्या टप्प्यात २० जागांवर मतदान झाले. या २० जागांवर अनेक दिग्गजांचे भवितव्य पणाला लागले आहे. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत छत्तीसगडमध्ये ७०.८७ टक्के मतदान झाले होते.
निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पाहिली तर दुपारी ३ वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान मोहला-मानपूर-अंबागड चौकी जिल्ह्यात झाले असून तेथे ७३ टक्के मतदारांनी मतदान केले. याशिवाय दुपारी तीन वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान विजापूर जिल्ह्यात झाले. येथे केवळ ३० टक्के मतदारांनी मतदान केले.
दरम्यान, छत्तीसगडमधील सुकमा येथे मतदान सुरू असतानाच, दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पदेडाच्या दक्षिण भागात पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक उडाली. ही चकमक मतदानाच्या दिवशी एरिया डॉमिनेशनसाठी निघालेल्या केंद्रीय राखीव पोलिसांच्या ८५ व्या कॉर्प्स आणि माओवाद्यांमध्ये झाली. जवळपास ८ ते १० मिनिटे चाललेल्या या चकमकीत २ ते ३ माओवादी मृतदेह घेऊन पळून जाताना दिसले. घटनास्थळी रक्त आणि ओढल्याच्या खुणाही आढळून आल्या आहेत. सर्व सैनिक सुरक्षित असून परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे.
मिझोराममध्येही मतदान पूर्ण-
मिझोराममध्ये मतदान पूर्ण झाले आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ६९.८७% लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. मिझोराममधील ११ जिल्ह्यांमध्ये लोंगतलाई येथे सर्वाधिक मतदान झाले. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, पहिल्या चार तासांत सर्वात कमी २६.१५ टक्के मतदान सैतुलमध्ये, २९.६२ टक्के आयझॉलमध्ये आणि ३०.५५ टक्के लुंगले येथे झाले.