लग्नात मिळालेल्या होम थिएटरचा भीषण स्फोट, लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी तरुणासह मोठ्या भावाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 02:10 PM2023-04-04T14:10:34+5:302023-04-04T14:17:48+5:30
स्फोटात घरातील चारजण गंभीर जखमी झाले, घराच्या भिंतीही कोसळल्या.
Blast News: तुम्हालाही मोठ्या आवाजात गाणे ऐकण्यासाठी होम थिएटरची आवड असेल तर ही बातमी तुम्ही जरूर वाचा. लग्नात भेट म्हणून मिळालेल्या होम थिएटरमध्ये मोठा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन भावांना आपला जीव गमवावा लागला. या स्फोटात इतर 4 जण जखमी झाले आहेत. हे प्रकरण छत्तीसगडमधील कबीरधाम जिल्ह्यातील आहे.
सोमवारी रेंगाखार पोलीस स्टेशन हद्दीतील चामारी गावातील घरात हा स्फोट झाला. या स्फोटात एक नवविवाहित तरुण आणि त्याच्या मोठ्या भावाला जीव गमवावा लागला. मात्र, हा स्फोट का झाला? याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. त्याचा तपास सुरू आहे. हा स्फोट इतका जोरदार होता की, ज्या खोलीत हे होम थिएटर ठेवण्यात आले होते त्या खोलीच्या भिंती कोसळल्या.
रेंगखार हे छत्तीसगड-मध्य प्रदेश सीमेजवळ आहे. हा भाग नक्षलग्रस्त समजला जातो. राजधानी रायपूरपासून हा सुमारे 200 किलोमीटर अंतरावर आहे. कबीरधामच्या एएसपी मनीषा ठाकूर यांनी सांगितले की, 1 एप्रिल रोजी 22 वर्षीय हेमेंद्र मेरावीचे लग्न झाले होते. सोमवारी ते आणि त्यांचे कुटुंबीय लग्नात मिळालेल्या भेटवस्तू उघडत होते. मेरावीने इलेक्ट्रिक बोर्डच्या वायरला जोडून म्युझिक सिस्टम चालू करताच मोठा स्फोट झाला. मेरवीचा तिथेच मृत्यू झाला.
स्फोटात त्याचा मोठा भाऊ राजकुमार (30) आणि इतर चार जण जखमी झाले. जखमींमध्ये दीड वर्षाच्या एका निष्पापाचाही समावेश आहे. या सर्वांना कावर्धा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान राजकुमार यांचा मृत्यू झाला. अन्य जखमींवर उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. स्फोटाची माहिती मिळताच फॉरेन्सिक तज्ज्ञांसह पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. स्फोटाचे खरे कारण शोधले जात आहे. तपासादरम्यान घरात स्फोटक पदार्थ सापडले नाहीत.