कमाल! शेतमजूर ते 'लखपती दीदी'; महिला शेतकरी उषाची सक्सेस स्टोरी, मोदींनीही केलं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 03:12 PM2023-08-17T15:12:54+5:302023-08-17T15:13:55+5:30
यशस्वी उद्योजक होण्याआधी उषा गावातल्या इतरांच्या शेतात रोजंदारीवर काम करायच्या.
छत्तीसगडमधील कोंडागावमध्ये राहणाऱ्या उषा देवींची गोष्ट सध्या दिल्लीपासून बस्तरच्या दऱ्याखोऱ्यांपर्यंत सांगितली जात आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना उषा यांच्या नावाचा उल्लेख केला होता. तेव्हापासून लोकांमध्ये त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. यशस्वी उद्योजक होण्याआधी उषा गावातल्या इतरांच्या शेतात रोजंदारीवर काम करायच्या.
मजुराची मुलगी ते लखपती दीदी होण्यापर्यंतचा प्रवास अवघड होता. लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांनी केलेल्या स्तुतीबद्दल उषा म्हणाल्या की देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान असलेल्या व्यक्तीने स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांना प्रोत्साहन दिले याचा कुटुंबाला अभिमान आहे. कोंडागाव जिल्हा मुख्यालयापासून 32 किमी अंतरावर असलेल्या ग्रामपंचायत बादालूर येथील उषा कोर्रम या अत्यंत गरीब कुटुंबातील आहेत.
उषा यांच्या कुटुंबात एकूण 9 सदस्य आहेत. कमी शेतजमीन आणि रोजगार नसल्याने संपूर्ण कुटुंब आर्थिक संकटात सापडले होते. लखपती दीदी योजनेच्या मदतीने त्यांची आर्थिक स्थिती सुधारली. आता त्या लखपती दीदी म्हणून ओळखल्या जातात. उषा यांच्या खांद्यावर संपूर्ण घराची जबाबदारी होती. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी त्या इतरांच्या शेतात काम करायच्या. आता उषा यांच्या आयुष्यात बदल झाला आहे. त्या भाजीपाला पिकवतात.
दररोज हजारो रुपयांहून अधिक किमतीचा भाजीपाला बाजारात विकला जात आहे. उषा कोर्रम यांच्याकडून आता गावातील इतर महिलाही प्रेरणा घेत आहेत. प्रगत तंत्रज्ञानाने शेती करण्यासाठी गावातील 50 मुली त्यांच्याकडून शेतीचे गुण शिकत आहेत. नैसर्गिक साधनसंपत्तीसह सेंद्रिय शेतीमध्ये पारंगत असलेल्या उषा या सेंद्रिय शेती करून जास्तीत जास्त उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांपैकी एक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उषा यांचे नाव घेतल्याने मुलींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे.