'हिड़मा अभी जिंदा है…', नक्षलवाद्यांचा दावा; आमचा कमांडर अजूनही जिवंत, सर्जिकल स्ट्राईक फेल!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 03:12 PM2023-01-17T15:12:02+5:302023-01-17T15:13:41+5:30
छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भागात नक्षलवाद्यांविरोधात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला नक्षलवाद्यांनी अपयशी ठरवले आहे.
छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भागात नक्षलवाद्यांविरोधात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला नक्षलवाद्यांनी अपयशी ठरवले आहे. छत्तीसगडमधील बस्तर, नक्षलग्रस्त भागात झालेला सर्जिकल स्ट्राईक फेल ठरल्याचा दावा माओवाद्यांनी केला आहे. नक्षल कमांडर हिडमा मरण पावला नसून तो अजूनही जिवंत असल्याचं नक्षलवाद्यांनी म्हटलं आहे. नक्षलवाद्यांनी जारी केलेल्या निवेदनात नक्षल कमांडर हिडमा जिवंत असल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलीस दलाने मात्र हा दावा फेटाळून लावला आहे.
नक्षवाद्यांचा प्रवक्ता समता यांनी जारी केलेल्या निवेदनात माओवादी बटालियन कमांडर माडवी हिडमा चकमकीत ठार झाल्याची माहिती खोटी असल्याचं म्हटलं आहे. माओवाद्यांनी कथित हवाई हल्ल्याची छायाचित्रे जारी केली आहेत. नक्षलवाद्यांच्या दाव्यानुसार ११ जानेवारी हा छत्तीसगडच्या इतिहासातील आणखी एक काळा दिवस ठरला आहे. सुकमा आणि विजापूरच्या सीमेवरील ठिकाणे बॉम्बफेक, ड्रोन आणि हेलिकॉप्टरद्वारे हवाई हल्ले करण्यात आली. हवाई दल आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड कमांडोचा वापर करून सर्जिकल स्ट्राईक ऑपरेशन सुरू करण्यात आले. त्यांनी हेलिकॉप्टरमधून अंदाधुंद गोळीबार केला आणि आम्ही चोख प्रत्युत्तर दिले, सहा जवान जखमी झाले आणि सर्जिकल स्ट्राईकचा उद्देश हाणून पाडला, असं नक्षलवाद्यांनी म्हटलं आहे.
'पाणी, जंगले कॉर्पोरेट घराण्यांच्या ताब्यात देण्यास सरकार तयार'
छत्तीसगड आणि बस्तरमधील नैसर्गिक क्षेत्र कॉर्पोरेट घराण्यांना देण्यासाठी सरकार या घटना घडवत असल्याचा आरोप माओवाद्यांनी केला आहे. लोकांना त्यांच्या जमिनी आणि जंगलातून हुसकावून लावण्याचा सरकारचा डाव आहे. एप्रिल २०२१ आणि एप्रिल २०२२ मध्ये सुरक्षा दलांनी बस्तरमध्ये केलेला हा तिसरा बॉम्बस्फोट असल्याचा दावा माओवाद्यांनी केला आहे. दरम्यान, सर्जिकल स्ट्राईकमध्ये पीएलजीएचे सदस्य पोटम हांगी मारले गेल्याचं त्यांनी कबुल केलं आहे.
नक्षलवाद्यांचा दावा पोलिसांनी फेटाळला
नक्षलवाद्यांचा दावा फेटाळून लावत बस्तर रेंजचे आयजीपी पी सुंदरराज म्हणाले की, नक्षलवादी लोकांची दिशाभूल करण्यासाठी असे दावे करत आहेत. छत्तीसगड आणि बस्तरमध्ये नक्षलवाद्यांना पराभूत केलं जात आहे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचेही मनोधैर्य खचत आहे. लोकांना भडकवण्याचा कट रचला जात आहे, परंतु सुरक्षा दलांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात असल्याचे आयजींनी सांगितले आहे.