Bijapur Naxalite Attack: बाबा... तुम्ही लवकर घरी या! नक्षलवादी हल्ल्यात बेपत्ता जवानाच्या मुलीची आर्त साद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 08:29 AM2021-04-06T08:29:55+5:302021-04-06T08:33:13+5:30
chhattisgarh naxal attack bijapur: या चकमकीनंतर बेपत्ता असलेल्या एका जवानाच्या मुलीने आपल्या वडिलांना आर्त साद घातली आहे.
रायपूर :छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी झालेल्या धुमश्चक्रीत २२ जवान शहीद झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. या चकमकीनंतर बेपत्ता असलेल्या एका जवानाच्या मुलीने आपल्या वडिलांना आर्त साद घातली आहे. (chhattisgarh naxal attack bijapur missing soldier daughter story)
राकेश्वर सिंह मनहास असे या बेपत्ता जवानाचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे. मनहास यांच्या लहानग्या मुलीला वडिलांची खूप आठवण येत असून, ते घरी आले नाही, म्हणून तिला अक्षरशः रडू कोसळत आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ समोर आला असून, वडिलांच्या आठवणीने लहानगी रडत असून, बाबा, तुम्ही लवकर घरी या, अशी आर्त साद घातल्याचे पाहायला मिळत आहे. मुलीच्या या निरागस सादेमुळे आजूबाजूला असलेल्या उपस्थितांचे डोळेही नकळत पाणावले.
#Bijapur#NaxalAttack में बंधक बनाए गए जवान की बेटी की आवाज़ सुनकर मन भावुक हो गया.
— Dipanshu Kabra (@ipskabra) April 5, 2021
परिवार के दर्द की हम सिर्फ कल्पना ही कर सकते हैं...
उनकी सुरक्षित वापसी के लिए हर संभव प्रयास किये जा रहे हैं. आपके पिताजी रक बहादुर योद्धा हैं बिटिया. आप भी उनकी तरह धैर्य और हिम्मत से काम लें... pic.twitter.com/8dwTw5xkj3
कुटुंबाचे मुलाच्या वाटेकडे डोळे
राकेश्वर सिंह मनहास यांच्या कुटुंबीयांचे त्यांच्या वाटेकडे डोळे लागले आहेत. जवान बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच कुटुंबात भीतीचे वातावरण पसरले आहे. राकेश्वर सिंह मनहास यांच्या पत्नीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पतीला सुरक्षित परत आणण्याची कळकळीची विनंती केल्याचे समजते. राकेश्वर सिंह मनहास हे सीमा सुरक्षा दलातील एक जवान असून, काही अधिकारी त्यांच्या घरी कुटुंबीयांना भेट देण्यासाठी गेले होते. मनहास हे नक्षलवाद्यांच्या तावडीत असल्याची माहिती मिळाली आहे.
Bijapur Naxalite Attack: जवानांचं सर्वोच्च बलिदान वाया जाऊ देणार नाही, ताकदीने लढू आणि जिंकून दाखवू: अमित शाह
अमित शाहांची घटनास्थळाला भेट
सुकमा आणि बीजापूर जिल्ह्यांच्या सीमाभागात ज्या ठिकाणी जवानांवर हा हल्ला झाला त्या ठिकाणीची शाह यांनी पाहणी केली. तसेच शहीद जवानांना देशाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी बोलताना, जवानांचं सर्वोच्च बलिदान वाया जाऊ देणार नाही. ताकदीने लढू आणि जिंकून दाखवू. छत्तीसगडच्या जनतेला आणि देशवासीयांना आश्वस्त करतो की, नक्षलवादाविरोधातील लढा आणखी तीव्र करण्यात येईल. गेल्या काही वर्षांपासून नक्षलवादाविरोधातील लढाई ही निर्णायक वळणावर पोहोचली असल्याचे शाह यांनी म्हटले आहे.
दरम्यान, छत्तीसगडमधील बिजापूर आणि सुकमा जिल्ह्यातील बस्तरच्या जंगलात सुरक्षा दलांनी एकत्रित येत नक्षलवाद्यांविरोधात कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले होते. तारेम येथून निघालेल्या एका पथकाची शनिवारी दुपारी जोनागुडा गावाजवळ नक्षलवाद्यांच्या एका गटाशी धुमश्चक्री उडाली. सुमारे तीन तासांपर्यंत ही धुमश्चक्री चालली होती. या चकमकीत शहीद झालेल्या पाच जवानांचे मृतदेह शनिवारी रात्री हाती लागले होते. १७ जवान मात्र बेपत्ता होते. रविवारी सुरक्षा दलांनी जंगलात शोध मोहीम हाती घेतली असता सर्व जवानांचे मृतदेह सापडले. या चकमकीत ३० जवान जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.