छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 06:45 PM2024-05-10T18:45:18+5:302024-05-10T18:45:38+5:30
गेल्या महिन्यात 16 एप्रिल रोजी सुरक्षा दलाने 29 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता.
Chhattisgarh Encounter : गेल्या काही दिवसांपासून छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलांची कारवाई सुरू आहे. शुक्रवारी(दि.10) विजापूरमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली. या घटनेत 6-8 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. सुरक्षा दलांनी घटनास्थळावरुन नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त केली आहेत.
Chhattisgarh | At least 6 Naxals killed in an ongoing encounter in the jungle of Pidiya under Gangaloor Police Station limit in Bijapur district: Sources
— ANI (@ANI) May 10, 2024
विजापूर, दंतेवाडा आणि सुकमा या तीन जिल्ह्यांतील सुमारे 1200 डीआरजी, एसटीएफ, कोब्रा आणि सीआरपीएफ जवानांचे 'नक्षलविरोधी ऑपरेशन'वर सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सुरक्षा दलाच्या टीमला विजापूरच्या जंगलात नक्षलवादी नेते लपल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी संयुक्त कारवाई सुरू केली.
सकाळी 6 वाजेपासून चकमक सुरू
सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक पहाटे 6 वाजल्यापासून सुरू होती आणि अजूनही सुरू आहे. तीन जिल्ह्यांचे आयजी, डीआयजी आणि एसपी या चकमकीवर लक्ष ठेवून आहेत. पोलिसांनी अद्याप याबाबत कोणतीही माहिती दिलेली नसली तरी सूत्रांच्या माहितीनुसार, बिजापूर जिल्ह्यातील गंगलूर पोलीस स्टेशन परिसरातील पेडिया जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक सुरू आहे.
कांकेरमध्ये 29 नक्षलवादी ठार झाले
सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधात केलेली ही पहिली मोठी कारवाई नाही. यापूर्वी गेल्या महिन्यात 16 एप्रिल रोजी कांकेर जिल्ह्यातील छोटाबेटिया भागात सुरक्षा दलांनी 29 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. यादरम्यान तीन जवानही जखमी झाले, त्यांना एअरलिफ्ट करून रायपूरला उपचारासाठी पाठवण्यात आले.